मुख्यमंत्री एकनाथ शिंदे कऱ्हाड दौऱ्यावर, 'ढाल-तलवार' कोण- कोण घेणार हातात?
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 25, 2022 11:43 IST2022-11-25T11:43:26+5:302022-11-25T11:43:50+5:30
सातारा जिल्ह्याला खुप मोठा राजकीय इतिहास आहे. या जिल्ह्याला मुख्यमंत्री पदाचा चारदा बहुमान मिळाला आहे

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे कऱ्हाड दौऱ्यावर, 'ढाल-तलवार' कोण- कोण घेणार हातात?
प्रमोद सुकरे
कऱ्हाड : महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे पदभार स्विकारल्यानंतर शुक्रवारी प्रथमच कऱ्हाडच्या राजकीय पंढरीत येत आहेत. दिवंगत यशवंतराव चव्हाण यांच्या पुण्यतिथीचे औचित्य साधत ते त्यांच्या स्मृतीस्थळाला अभिवादन करणार आहेत. त्यानंतर त्यांचे अनेक शासकीय कार्यक्रम होणार असून दुपारी कऱ्हाडकरांच्यावतीने त्यांचा नागरी सत्कार करण्यात येणार आहे. या राजकीय कार्यक्रमात अनेकजण पक्षप्रवेश करणार असल्याचे बोलले जाते. पण प्रत्यक्षात शिंदे गटाची ढाल तलवार कोण कोण हातात घेणार,? याबाबत राजकीय वर्तुळात चर्चा सुरू आहे.
सातारा जिल्ह्याला खुप मोठा राजकीय इतिहास आहे. या जिल्ह्याला मुख्यमंत्री पदाचा चारदा बहुमान मिळाला आहे. दिवंगत यशवंतराव चव्हाण हे तर महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री होत. त्यानंतर बाबासाहेब भोसले, पृथ्वीराज चव्हाण यांनीही मुख्यमंत्रीपद भुषविले. तर सध्या सातारा जिल्ह्याचेच सुपुत्र एकनाथ शिंदे मुख्यमंत्री म्हणून कार्यरत आहेत.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे प्रथमच कऱ्हाडला येत असल्याने त्यांच्या भरगच्च कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. पालकमंत्री शंभूराज देसाई स्वत: यामध्ये लक्ष घालून नियोजन करीत आहेत. त्यासाठी त्यांनी अनेक आढावा बैठका घेतल्या आहेत. या दौºयात कुठलीही कुचराई राहणार नाही, याची दक्षता देसाई घेताना दिसत आहेत.
कऱ्हाड दौरा हा ग्रामीण विभागापेक्षा शहराच्या राजकारणात उलथापालथ घडविणारा ठरेल, असे मानले जाते. उद्याच्या जाहिर कार्यक्रमात अनेकजण जाहिर प्रवेश करणार असल्याचे बोलले जाते. नक्की कोण कोण बाळासाहेबांच्या शिवसेनेत प्रवेश करणार,? यावरच कऱ्हाडची राजकीय परिस्थिती नेमकी काय होईल, याचा अंदाज बांधता येईल.
कऱ्हाड येथील यशवंत विकास आघाडीचे प्रमुख राजेंद्र यादव यांनी या नागरी सत्कारासाठी पुढाकार घेतला आहे. त्यामुळे या आघाडीचे नगरसेवक बाळासाहेबांच्या शिवसेनेत उद्या प्रवेश करतील, अशी चर्चा आहे. पण आघाडीचे सर्व माजी नगरसेवक शिंदे गटात प्रवेश करणार का? हे कळण्यासाठी थोडे थांबावेच लागेल.
शंभूराज देसाईंची छाप
कऱ्हाडनजीकच्या पाटणचे आमदार, बाळासाहेबांच्या शिवसेनेचे नेते, पालकमंत्री शंभूराज देसाई मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे निकटवर्तीय मानले जातात. चार महिन्यापुर्वी झालेल्या सत्ता संघर्षातही देसाई़ंची महत्वाची भुमिका राहिली आहे. त्यामुळे मुख्यमंत्र्यांच्या दौऱ्यावर पालकमंत्र्यांची छाप दिसत आहे.
अर्धा डझनावर मंत्र्यांची उपस्थिती
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या दौऱ्यात अर्धा डझनावर मंत्र्यांची उपस्थिती असणार आहे. पालकमंत्री शंभूराज देसाई,महसूल मंत्री राधाकृष्ण विखे-पाटील, कृषिमंत्री अब्दुल सत्तार, रोजगार मंत्री दादा भुसे आदी या दौºयात येणार आहेत. त्यामुळे या दौऱ्याला विशेष महत्व आहे.
... हा विकासाचा सेतू!
पुल म्हणजेच 'सेतू'. सेतू हा नदीपात्राच्या दोन काठांना जोडणारा दुवा असतो. कऱ्हाड तालुक्यातही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी मंजूर केलेल्या दोन पुलांचे भुमीपुजन होणार आहे. आता दोन पक्षाचे हे नेते विकासाचाच सेतू बांधत आहेत, असेच म्हणायचे का?