Chanda Tigress: ताडोबातून आणलेल्या वाघिणीचा चांदोली जंगलात मुक्तसंचार सुरू-video
By प्रमोद सुकरे | Updated: November 20, 2025 15:21 IST2025-11-20T15:21:06+5:302025-11-20T15:21:39+5:30
व्याघ्र संख्या वाढविण्यासाठीचा महत्त्वपूर्ण व ऐतिहासिक टप्पा साध्य

Chanda Tigress: ताडोबातून आणलेल्या वाघिणीचा चांदोली जंगलात मुक्तसंचार सुरू-video
प्रमोद सुकरे
कराड : सह्याद्री व्याघ्र प्रकल्पामध्ये व्याघ्र संख्या वाढविण्यासाठी गुरुवारी एक महत्त्वपूर्ण व ऐतिहासिक टप्पा साध्य करण्यात आला. पूर्वी नियंत्रित पिंजरा मध्ये ठेवण्यात आलेली वाघीण (एस टी आर टी -४ )ला दि. १८ रोजी चांदोली राष्ट्रीय उद्यानातील नैसर्गिक जंगल क्षेत्रात यशस्वीरीत्या मुक्त करण्यासाठी दरवाजे उघडे करण्यात आले होते.
गेली २ दिवस वाघीण त्याच एनक्लोजरमध्ये आत फिरत होती. तिने आतमध्ये शिकार केली होती व ते खाऊन तेथेच आत २ दिवस राहीली. दोन दिवस दरवाजा उघडा ठेवला होता तरी ती बाहेर गेली नाही. मात्र पिंजऱ्यातील या वाघिणीचे शुक्रवारी (दि.२१) सकाळी ८ वाजता पिंजरा सोडला अन डौलदारपणे ती जंगलात निघून गेली आहे.
वाचा : चंदा वाघिणीने डरकाळी फोडली, ताडोबातून ८५० किलोमीटरचा प्रवास करुन सह्याद्रीत पोहचली
सदरची वाघिणीच्या चांदोलीत आगमनानंतर वाघिणीवर वैज्ञानिक पद्धतीने अनुकूलन, निरीक्षण व प्रक्रिया राबविण्यात आली. या काळात तिची हालचाल, नैसर्गिक प्रतिक्रिया, शिकार प्रवृत्ती, क्षेत्रचिन्हीकरण व हवामानाशी जुळवून घेण्याची क्षमता या सर्व गोष्टींचे तज्ज्ञांच्या उपस्थितीत निरीक्षण करण्यात आले. वन्यजीव संशोधक व पशुवैद्यकीय अधिकारी यांनी दररोज तपासणी करून तिला पूर्णपणे तंदुरुस्त घोषित केले.
“वाघिणीने एनक्लोजरमध्ये उत्कृष्ट अनुकूलन क्षमता दर्शविली असून नैसर्गिक परिस्थितीशी सुसंगत वर्तन आढळले आहे. ती पूर्णतः तंदुरुस्त असून जंगलातील स्वावलंबी जीवनासाठी सिद्ध आहे. आम्ही तज्ञांच्या सहकार्याने वैज्ञानिक व जबाबदार पद्धतीने तिच्या निरीक्षणाचे पुढील टप्पे कार्यान्वित करणार आहोत. हा टप्पा सह्याद्री व्याघ्र पुनर्स्थापना उपक्रमासाठी अत्यंत महत्त्वपूर्ण आहे.” - तुषार चव्हाण, क्षेत्र संचालक, सह्याद्री व्याघ्र प्रकल्प
“महाराष्ट्रात व्याघ्र संवर्धन कार्यक्रम वैज्ञानिक पद्धतीने व दीर्घकालीन धोरणांनुसार राबविला जात आहे. सदर वाघीण पर्यावरणाशी यशस्वीरीत्या अनुकूल झाली असून नैसर्गिक वर्तनही दिसून येत आहे. तज्ञ पथकाकडून तिचे सतत निरीक्षण होत असल्यामुळे सह्याद्री व्याघ्र संवर्धन प्रयत्नांना मोठी चालना मिळेल.” - एम.एस.रेड्डी, प्रधान मुख्य वन्यजीव रक्षक, महाराष्ट्र राज्य
सह्याद्री व्याघ्र प्रकल्प साठी हा एक महत्त्वपूर्ण टप्पा आहे. ह्यामुळे सह्याद्री मध्ये भविष्यात टायगर टूरिजम (व्याघ्र पर्यटन) वाढ होण्यास मदत होईल - रोहन भाटे, मानद वन्यजीव रक्षक