सीसीटीव्ही मलकापुरात चौकात; पण दादागिरी आडवाटेला!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 27, 2017 14:50 IST2017-10-27T14:44:40+5:302017-10-27T14:50:45+5:30
चौकाचौकात सीसीटीव्ही कॅमेरे बसविल्यामुळे मलकापूर शहरातील युवकांनीही हाणामारी करण्याची ठिकाणे बदलली आहेत. गत चार दिवसांत तीन ठिकाणी भांडणाचे प्रकार घडले असून, आडमार्गाच्या रस्त्यांवरच आता हाणामारीच्या घटना घडत आहेत.

सीसीटीव्ही मलकापुरात चौकात; पण दादागिरी आडवाटेला!
मलकापूर , दि. २७ : चौकाचौकात सीसीटीव्ही कॅमेरे बसविल्यामुळे शहरातील युवकांनीही हाणामारी करण्याची ठिकाणे बदलली आहेत. गत चार दिवसांत तीन ठिकाणी भांडणाचे प्रकार घडले असून, आडमार्गाच्या रस्त्यांवरच आता हाणामारीच्या घटना घडत आहेत.
मलकापुरात गुन्हेगारी रोखण्यासाठी नगरपंचायतीने आगाशिवनगर येथे झेडपी कॉलनी, शिवछावा चौक, मलकापूर फाटा, कोल्हापूर नाका, शिवाजी चौक, कन्याशाळा परिसर अशा सहा ठिकाणी सोळा सीसीटिव्ही कॅमेरे बसवले आहेत. त्यामुळे चौकाचौकात होणाºया गुन्हेगारीचे प्रमाण काही प्रमाणात कमी होण्यास मदत झाली आहे. मात्र, गेली पाच दिवसांत घडलेल्या घटनांवरून आडमार्गावर गुन्हेगारीच्या घटना घडत असल्याचे चित्र दिसत आहे.
काही दिवसांपूर्वी मुलींची छेड काढल्याच्या कारणावरून युवकांच्यात बाचाबाची झाली. याच बाचाबाचीचा राग मनात धरून व मुलीची छेड काढल्याच्या घटनेचा संदर्भ घेऊन दुसऱ्या दिवशी एकावर चाकूने वार करून त्याला जखमी करण्यात आले. संबंधित जखमी युवकावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
ही घटना ताजी असतानाच नटराज थिएटरजवळ अज्ञात कारणावरून एकास बेदम चोप देण्यात आला. अशा पद्धतीने आगाशिवनगर व उपनगरात युवकांच्या गटात वारंवार मारामारी व भांडणाचे प्रकार घडत आहेत.
येथील कृष्णा रुग्णालयासमोरील उड्डापुलाखाली किरकोळ कारणामुळे पोलिसांसमोरच युवकांच्या दोन गटांत राडा होण्याच्या घटना वारंवार घडत असतात. उड्डाणपुलासह रुग्णालय परिसरात सलग हाणामारीच्या घटना घडल्यामुळे अनेकवेळा तणावाचे वातावरण निर्माण होते. युवकांच्या दोन गटांत किरकोळ कारणांवरून हाणामारी होत असते. त्यानंतर घटनास्थळावर पोलिस पोहोचेपर्यंत संबंधित युवक पसार होतात. त्यामुळे अशा घटनांची कोठेही नोंद होत नाही.
बाहेरून आलेल्या युवकांचा राडा
मलकापुरात विविध संस्थेच्या शैक्षणिक शाखा उभारण्यात आल्या आहेत. शिक्षणासाठी बाहेरून येणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या जास्त आहे. याशिवाय रुग्णालय, अनेक व्यवसाय व नोकरी निमित्ताने शहरात येणाऱ्याची संख्या मोठी आहे. अनेकवेळा परगावात झालेल्या भांडणाचे मलकापुरात उट्टे काढण्याच्या घटनाच वारंवार घडतात. त्यामुळे बाहेरून आलेल्या भांडणातील युवकांचाच राडा मलकापुरात घडत आहे.