एटीएममधून आल्या जळक्या, पुसट, कलर नसलेल्या नोटा, ग्राहकांमधून संताप
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 5, 2022 18:06 IST2022-09-05T17:36:28+5:302022-09-05T18:06:27+5:30
नोटा एटीएममध्ये भरणा करताना आढळून आल्या नाहीत का, अशा नोटा चालतील का, त्या मशीनमध्ये भरताना जळक्या, फाटक्या का भरल्या अशा विविध प्रश्नांची चर्चा औंधमध्ये दिवसभर सुरू होती.

एटीएममधून आल्या जळक्या, पुसट, कलर नसलेल्या नोटा, ग्राहकांमधून संताप
औंध : औंध येथील एका एटीएममधून काहींनी पैसे काढताच त्यातून फाटक्या, जळक्या व खराब नोटा पदरी पडल्याने एकच खळबळ उडाली आहे.
औंध येथील बापूसाहेब कुंभार यांनी सकाळी साडेनऊच्या सुमारास पाच हजार काढले, पैसे मिळाल्यानंतर एका पाठोपाठ एक नोट चेक केली असता फाटक्या, जळक्या व खराब नोटा असल्याचे आढळून आले, तर काही वेळाने प्रा. प्रकाश शिंदे यांनीही दहाच्या दरम्यान पैसे काढल्यानंतर त्यांनाही तशाच प्रकारच्या नोटा मिळाल्या. अशाच प्रकारे आणखी दोघा-चौघांनी पैसे काढल्यावर काहींना तर धुतलेल्या, पुसट व कलर नसलेल्या नोटा मिळाल्या, त्यामुळे ग्राहकांनी संताप व्यक्त केला आहे.
दरम्यान, अशा प्रकारच्या नोटा एटीएममध्ये भरणा करताना आढळून आल्या नाहीत का, अशा नोटा चालतील का, त्या मशीनमध्ये भरताना जळक्या, फाटक्या का भरल्या अशा विविध प्रश्नांची चर्चा औंधमध्ये दिवसभर सुरू होती. रविवार असल्याने औंध येथे अनेक भाविक भक्त, पर्यटक आवर्जून औंधला हजेरी लावतात. डिजिटल युगात रोख रक्कम जवळ शक्यतो कोणीही बाळगत नाहीत. त्यामुळे एखाद्या भक्त किंवा पर्यटकालाही या नोटांचा फटका बसला असेल. त्यामुळे ऐतिहासिक औंधनगरीत अशा सुविधा बँकांनी जबाबदारीने द्यायला अपेक्षित आहे.