bullock cart race : पुसेगावमध्ये आनंदोत्सव, बैलांची तसेच खोंडांची वाजत-गाजत काढली मिरवणूक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 16, 2021 18:47 IST2021-12-16T18:37:28+5:302021-12-16T18:47:50+5:30
पुन्हा उडणार बैलगाडा शर्यतीचा धुरळा. बैलगाडा शर्यत शौकीनाकडून न्यायालयांच्या निर्णयाचे जंगी स्वागत.

bullock cart race : पुसेगावमध्ये आनंदोत्सव, बैलांची तसेच खोंडांची वाजत-गाजत काढली मिरवणूक
पुसेगाव : सर्वोच्च न्यायालयाने बैलगाडा शर्यतीवरील बंदी उठविण्याचा निर्णय दिला. न्यायालयाच्या या निर्णयाचे बैलगाडा शर्यत शौकीनाकडून जंगी स्वागत करत पुसेगावमध्ये आनंदोत्सव साजरा केला. हलगीचा कडकडाट, गुलालाची उधळण, फटाक्यांची आतषबाजी करत शर्यतीत पळणाऱ्या बैलांची तसेच खोंडांची वाजतगाजत मिरवणूक काढण्यात आली. छ शिवाजी चौकात तसेच ठिकठिकाणी साखर-पेढे वाटून सर्वोच्च न्यायालयाच्या या निर्णयाचे स्वागत करण्यात आले.
न्यायालयाने बैलगाडा शर्यतीवर बंदी घातल्यापासून शर्यत शौकीन व शेतकरी वर्गातून नाराजी व्यक्त होत होती. यावर राज्य सरकारच्या वतीने दाखल करण्यात आलेल्या याचिकेवर आज, गुरुवार (दि.16) सुनावणी झाली. यावेळी न्यायालयाने बैलगाडी शर्यतीला काही अटींवर परवानगी दिली. यामुळे राज्यातील बैलगाडा मालकांना दिलासा मिळाला आहे.
पुसेगाव यात्रेतील मुख्य आकर्षण म्हणजे बैलगाड्याच्या शर्यती. याच यात्रेत खिलार जनावरांचा मोठा बाजार ही भरतो. मात्र शर्यती वरील बंदीमुळे कित्येक वर्षे शर्यती व जनावरांचा बाजारही भरला नाही. खोंडांची मागणी कमी झाल्याने शेतकऱ्यांनी खिलार गाई पाळणे ही बंद केले होते. अखेर बैलगाडा शर्यतीवरील बंदी उठल्यावर बैलगाडी शर्यत शौकीनांना मोठा दिलासा मिळाला आहे. त्यामुळे येत्या काही दिवसात आता बैलगाडा शर्यतीचा धुरळा उडणार आहे.