शेततळ्यात बुडून सख्ख्या भाऊ-बहिणीचा मृत्यू; पवार कुटुंबीयांवर शोककळा
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 17, 2022 22:28 IST2022-01-17T22:28:15+5:302022-01-17T22:28:25+5:30
रात्री उशिरा पाटण ग्रामीण रुग्णालयात शवविच्छेदन केल्यानंतर दोन्ही मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आले.

शेततळ्यात बुडून सख्ख्या भाऊ-बहिणीचा मृत्यू; पवार कुटुंबीयांवर शोककळा
कोयनानगर - रोमनवाडी (येराड), ता. पाटण येथे सोमवारी सायंकाळी 5 वाजण्याच्या सुमारास शेततळ्यात बुडुन सख्खा बहिण- भावाचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे.
याबाबत स्थानिकांकडुन मिळालेल्या माहितीनुसार रोमनवाडी येथील एका फार्म हाऊसवर कामावर असलेले सचिन जाधव (रा रोमनवाडी) यांच्याकडे पाहुणे म्हणुन आलेले अनिल पवार (रा काठी ता पाटण) हे आपल्या पत्नीसह दोन मुलासमवेत आले होते. ते सर्वजण फार्म हाऊसकडे गेले असता सौरभ अनिल पवार (वय 16 रा काठी) व पायल अनिल पवार (वय 14) ही दोन मुले पळत शेततळ्याकडे गेली होती. मुलाचा पाय घसरल्याने तो बुडत असताना त्याला वाचवायला बहिण पायल गेली असता तीही बुडु लागली. ही बाब सचिन जाधव व मुलाचे आई-वडील यांना समजातच ते पळत गेले असता दोन्हीही मुले पाण्यात बुडलेली होती. रात्री 8 वाजता शिरळ येथील मासेमारी करणाऱ्या लोकांनी दोन्ही मुलांना बाहेर काढले. मुलगा रेठरे येथे आय टी आय व मुलगी विजयनगर येथे इयत्ता आठवीत शिकत आहे. भाऊ-बहिणीच्या मृत्यूने परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. दरम्यान, रात्री उशिरा पाटण ग्रामीण रुग्णालयात शवविच्छेदन केल्यानंतर दोन्ही मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आले. घटनास्थळी पाटणचे पीएसआय महेश पाटील व कर्मचारी यांनी भेट देऊन पंचनामा केला. यावेळी सरपंच प्रकाश साळुंखे, गावकामगार तलाठी पी जी शिंदे उपस्थित होते.