Satara: रहिमतपूरच्या हनुमान मंदिरात १२ मतदारांची नोंद - सुनील माने; उच्च न्यायालयात रिट पिटीशन दाखल
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 28, 2025 13:44 IST2025-10-28T13:44:09+5:302025-10-28T13:44:43+5:30
एकाच घरात ३७ मतदारांची नोंद

Satara: रहिमतपूरच्या हनुमान मंदिरात १२ मतदारांची नोंद - सुनील माने; उच्च न्यायालयात रिट पिटीशन दाखल
कराड : रहिमतपूर येथील मतदार यादीत मोठ्या प्रमाणात बोगस मत नोंदणी झालेली आहे. हनुमान मंदिरात बारा तर शाळेमध्येही बोगस मतदार नोंद झाली आहे. हरकती घेण्यासाठी गेलो असता, आमच्याच कार्यकर्त्यांवर शासकीय कामात अडथळा आणल्याबाबतचे गुन्हे दाखल केले. याबाबत उच्च न्यायालयात रिट पिटीशन दाखल केले आहे, अशी माहिती शरद पवार राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष सुनील माने यांनी दिली.
कराड येथे सोमवारी माध्यमांशी ते बोलत होते. सुनील माने कार्यकर्त्यांसह कराड तहसीलदार कार्यालयात दाखल झाले. तहसीलदार आणि प्रांत उपस्थित नसल्याने कार्यालयातील कर्मचाऱ्यांना गुलाब पुष्प देऊन गांधीगिरी करत आपल्या भावना व्यक्त केल्या. यावेळी माजी नगराध्यक्ष आनंदराव कोरे, अविनाश माने, सह्याद्री साखर कारखान्याचे संचालक रमेश माने, माजी नगरसेवक विद्याधर बाजारे उपस्थित होते.
माने म्हणाले, रहिमतपूर नगरपालिका मतदार यादीत ६१७ मतदारांची नावे दुबार आहेत. ती दुबार नावे कमी करावीत, यासाठी मुख्याधिकाऱ्यांकडे आम्ही निवेदन दिले आहे. बोगस मतदार नोंदणीबाबत पुराव्यानिशी हरकती दाखल केल्या आहेत.
माझ्या घरात १६ बोगस मतदारांची नोंद
रहिमतपूर येथील माझ्या घरात आम्ही कुटुंबीय राहतो. मात्र, आमची मते सोडून आमच्या घराचा पत्ता देत, १६ बाहेरच्या लोकांची नावे नोंदविण्यात आली आहेत, अशी माहिती सागर शेडगे यांनी दिली.
दहा बाय दहाचे मंदिर
रहिमतपूरच्या प्रभाग नऊमधील मिळकत १९५७ हे १० बाय १०चे हनुमान मंदिर आहे. मात्र, या पत्त्यावर विविध जाती धर्माच्या व्यक्तींची १२ नावे मतदार यादीत समाविष्ट करण्यात आली आहेत. मग निवडणूक यंत्रणेने नेमकी काय पडताळणी केली हा प्रश्न पडतो, असेही माने म्हणाले.
एकाच घरात ३७ मतदारांची नोंद
घर क्रमांक १६८८ या एकाच घरात विविध जातीधर्माचे, वेगवेगळ्या आडनावाची ३७ नावे मतदार यादीत आढळून येतात. ही सर्व नावे बोगस असून, त्याची चौकशी करून कारवाई करण्याची मागणी मुख्याधिकाऱ्यांकडे केली असल्याचे माने यांनी सांगितले.
शाळेच्या पत्त्यावर १९ मतदार
मी ज्या शिक्षण संस्थेचा अध्यक्ष आहे. त्या शिक्षण संस्थेचे डॉ.वसंतदादा पाटील विद्यालय रहिमतपूर येथे आहे. येथे विद्यार्थ्यांना ज्ञानदानाचे काम केले जाते, पण या पत्त्यावर तब्बल १९ लोकांचे बोगस मतदान नोंद करण्यात आले आहे. याबाबतही आम्ही दाद मागितली आहे.
बीएलओंचीच ३ ठिकाणी मतदान नोंद
शासकीय कामात अडथळा आणल्याबाबत ज्या बीएलओनी तक्रार केली आहे. त्या ज्योती जाधव-कदम यांचेच नाव रहिमतपूरच्या मतदार यादीत ३ प्रभागांत ३ ठिकाणी आहे. त्यांनी विधानसभा निवडणुकीत ३ ठिकाणी मतदान केले आहे. त्या स्वतःचे नाव एकाच गावातल्या मतदार यादीत ३ वेळा घुसडत असतील, तर त्यांच्याकडून आणखी चांगली काय अपेक्षा करणार, असा प्रश्न सुनील माने यांनी यावेळी उपस्थित केला.