तक्रारी नसल्यानेच बोगस डॉक्टर जोरात !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 2, 2021 05:25 IST2021-09-02T05:25:13+5:302021-09-02T05:25:13+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क सातारा : काही जण डॉक्टर असल्याचा आव आणून रुग्णांवर उपचार करतात. अशा बोगस डॉक्टरांवर आरोग्य ...

तक्रारी नसल्यानेच बोगस डॉक्टर जोरात !
लोकमत न्यूज नेटवर्क
सातारा : काही जण डॉक्टर असल्याचा आव आणून रुग्णांवर उपचार करतात. अशा बोगस डॉक्टरांवर आरोग्य विभागाच्या वतीने कारवाई करण्यात येते. मागील सव्वा वर्षाचा विचार करता तक्रारीनंतर पाच जणांची चौकशी तर एकावर कारवाई झाली. बोगस डॉक्टरांबद्दल तक्रारीच नसल्याने कारवाया कमी होत असल्याचे वास्तव आहे.
मागील सव्वा वर्षापासून जिल्ह्यात कोरोनाो संकट आहे. या महामारीच्या काळात वैद्यकीय ज्ञान नसणारे काही जण कोरोना बरा करतो असे म्हणून पैसे कमवत आहे. दुर्गम व ग्रामीण भागात कोणतीतरी वैद्यकीय पदवी घेतल्याची पाटी लावून रुग्णांवर उपचार करतात. उपचाराबाबतचे ज्ञानही त्यांच्याकडे नसते. अशा बोगस डॉक्टरांवर आरोग्य विभागाच्या वतीने कारवाई करण्यात येते. पण, त्यांच्याविषयी समितीकडे तक्रारच येत नसल्याने त्यांचा व्यवसाय जोरात सुरू असतो.
.....................................
सव्वा वर्षात कोणत्या तालुक्यात किती कारवाया...
माण ००
खटाव ०१
कोरेगाव ००
फलटण ००
वाई ००
खंडाळा ००
सातारा ००
कऱ्हाड ००
.......................
जिल्ह्यातील ग्रामीण भागात अधिकृत रुग्णालये ४३३
.............................
वर्षभरात बोगस डॉक्टरवर कारवाई १
......................................
१० तालुक्यांत एकही कारवाई नाही...
२०२० मधील मार्च महिन्यापासून मार्च २०२१ पर्यंत जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागाकडे एकूण ५ तक्रारी प्राप्त झाल्या होत्या. या तक्रारीच्या अनुषंगाने पाचही डॉक्टरांकडे चौकशी करण्यात आली. त्यामध्ये एक जण बोगस डॉक्टर सापडला. त्याच्यावर आरोग्य विभागाच्या वतीने कारवाई करण्यात आली.
............................................
तालुका समितीत कोण-कोण असते...
वैद्यकीय पदवी नसताना कोणी डॉक्टर म्हणून रुग्णांवर उपचार करत असेल तर त्याविषयी तक्रार येणे महत्त्वाचे असते. यासाठी तालुकास्तरावर एक समिती असते. या समितीत गटविकास अधिकारी, तालुका आरोग्य अधिकारी आणि आरोग्य विभागाच्या विस्तार अधिकारी यांचा समावेश असतो. ही समिती तक्रार आलेल्या डॉक्टरांची चौकशी करत असते.
.......................................................
सर्वसामान्यांच्या जिवाशी खेळ...
वैद्यकीय ज्ञान नसणारे डॉक्टरची पाटी लावून ग्रामीण आणि दुर्गम भागात दवाखाना थाटतात. भोळ्या, भाबड्या व निरक्षर लोकांचा फायदा घेतात; पण त्यांच्याकडून रुग्णांच्या जिवाशी खेळ सुरू होतो. काहीवेळा रुग्णाचा मृत्यूही होतो. तर काही दिवस उपचार करूनही फरक न पडल्यास रुग्णांला पुन्हा मोठ्या रुग्णालयात घेऊन जाण्याबाबत नातेवाइकांना सांगितले जाते.
......................
कोट :
जिल्ह्यातील पूर्ण आढावा घेऊन कोणी बोगस डॉक्टर आहेत का याची माहिती घेण्यात येईल. तसे कोणी आढळून आल्यास समिती व पथकामार्फत संबंधितावर कारवाई केली जाईल. पदवी नसताना कोणी वैद्यकीय व्यवसाय करत असेल तर नागरिकांनी त्याची तक्रार आरोग्य विभागाकडे करावी.
- राधाकिशन पवार, जिल्हा आरोग्य अधिकारी
......................................................................