साताऱ्यातील नागरिकांचा पाण्यासाठी रास्ता रोको, वाहतुकीची कोंडी
By सचिन काकडे | Updated: March 29, 2024 11:40 IST2024-03-29T11:39:45+5:302024-03-29T11:40:12+5:30
चार दिवसांपासून अनियमित पाणीपुरवठा

साताऱ्यातील नागरिकांचा पाण्यासाठी रास्ता रोको, वाहतुकीची कोंडी
सातारा : चार दिवसांपासून पाणीटंचाईने त्रस्त असलेल्या बुधवार पेठ परिसरातील रहिवाशांनी शुक्रवारी सकाळी दहा वाजता बुधवार नाका चौकात रास्ता रोको केला. या आंदोलनात हंडा-कळशी घेऊन महिला मोठ्या संख्येने सहभागी झाल्या. संतप्त नागरिकांनी सुमारे एक तास रस्ता अडवून धरल्याने वाहतुकीची प्रचंड कोंडी झाली.
सातारा शहरात गेल्या काही दिवसांपासून तीव्र पाणीटंचाई निर्माण झाली आहे. नागरिकांना पाण्यासाठी नगरपालिकेसह खाजगी टँकरचा आधार घ्यावा लागत आहे. शिवाय ऐन उन्हाळ्यात पालिकेने पाणी कपात सुरू असून, जलवाहिनीला लागणारी गळती, अपुरा व अनियमित पाणीपुरवठा अशा समस्यांनादेखील नागरिकांना तोंड द्यावे लागत आहे.
बुधवार नाका परिसरात चार दिवसांपासून अनियमित पाणीपुरवठा सुरू आहे. पालिकेच्या पाणीपुरवठा विभागाला याची कल्पना देऊनही कोणत्याही उपाय योजना न करण्यात आल्याने शुक्रवारी सकाळी दहा वाजता येथील रहिवाशांनी बुधवार नाका चौकात हंडा-कळशी रस्त्यावर मांडून रास्ता रोको केला. संतप्त नागरिकांनी सुमारे एक तास रस्ता अडवून धरल्याने वाहतुकीची कोंडी झाली. शाहूपुरी पोलिसांनी नागरिकांची समजूत काढण्याचा प्रयत्न केला; परंतु पाणीपुरवठ्याबाबत ठोस उपाययोजना केल्या जात नाहीत तोपर्यंत आंदोलन स्थगित न करण्याची भूमिका नागरिकांनी घेतली.
दरम्यान, पाणीपुरवठा विभागाच्या कर्मचाऱ्यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेऊन नागरिकांच्या अडचणी जाणून घेतल्या. जलकुंभ पूर्ण क्षमतेने भरल्यानंतर या भागाला दुपार सत्रात मुबलक पाणीपुरवठा करण्याचे आश्वासन कर्मचाऱ्यांनी दिले. यानंतर हे आंदोलन स्थगित करण्यात आले.