साताऱ्यात भाजप स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका स्वबळावर लढणार, जिल्हाध्यक्षांनी दिली माहिती 

By नितीन काळेल | Updated: February 20, 2025 19:21 IST2025-02-20T19:21:06+5:302025-02-20T19:21:32+5:30

भाजप सदस्य नोंदणी ३ लाखांवर..

BJP will contest local body elections on its own in Satara, district president informed | साताऱ्यात भाजप स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका स्वबळावर लढणार, जिल्हाध्यक्षांनी दिली माहिती 

साताऱ्यात भाजप स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका स्वबळावर लढणार, जिल्हाध्यक्षांनी दिली माहिती 

सातारा : सातारा जिल्ह्याला ४५ हजार घरकुले मंजूर असून शनिवारी लाभार्थींना कामाबाबत आदेश देण्यात येणार आहे. सातारा जिल्हा परिषदेत पालकमंत्र्यांच्या हस्ते हा कार्यक्रम होईल. त्याचबरोबर स्थानिक स्वराज्य संस्थेच्या जिल्ह्यातील निवडणुका भाजप पक्ष स्वबळावर लढवेल, अशी माहिती जिल्हाध्यक्ष धैर्यशील कदम यांनी दिली.

येथील शासकीय विश्रामगृहात आयोजित पत्रकार परिषदेत जिल्हाध्यक्ष कदम बोलत होते. यावेळी जिल्हा परिषद कृषी समितीचे माजी सभापती भीमराव पाटील, भाजपचे जिल्हा सरचिटणीस विठ्ठल बलशेटवार, सुनील शिंदे, शहराध्यक्ष विकास गोसावी, तालुकाध्यक्ष महेश गाडे, कऱ्हाड दक्षिण अध्यक्ष धनंजय पाटील, कोरेगाव अध्यक्ष संतोष जाधव, कऱ्हाड शहराध्यक्ष एकनाथ बागडी आदी उपस्थित होते.

जिल्हाध्यक्ष कदम म्हणाले, देशात भाजपची सत्ता सलग तिसऱ्यांदा आलेली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे सरकार गरिबांसाठी काम करणारे आहे. महाराष्ट्रातही देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असून त्यांनी १०० दिवसांचा रोडमॅपच दिलाय. त्यातूनच आता गरिबांचं घरकुलाचं स्वप्न साकार होत आहे. सातारा जिल्ह्याला ४५ हजारांहून अधिक घरकुले मंजूर आहेत. 

या घरकुल कार्यारंभ कार्यक्रम शनिवारी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आणि मुख्यमंत्री फडणवीस यांच्या उपस्थितीत होत आहे. सातारा जिल्हा परिषदेतही पालकमंत्र्याच्या प्रमुख उपस्थितीत जिल्ह्यातील लाभार्थ्यांना घरकूल काम सुरू करण्याबाबत आदेश देण्यात येईल. जिल्ह्यातील सर्व घरकुले एक वर्षात बांधून पूर्ण करण्याचा प्रयत्न राहणार आहे.

दरम्यान, या पत्रकार परिषदेतच पत्रकारांनी राष्ट्रवादी काॅंग्रेसचे मंत्री मकरंद पाटील यांनी जिल्ह्यात स्थानिक स्वराज्य संस्था निवडणूक स्वबळावर लढण्याबाबत भाष्य केल्याचा प्रश्न केला. यावर जिल्हाध्यक्ष कदम यांनी भाजपही जिल्ह्यातील स्थानिक स्वराज्य संस्थेच्या सर्व निवडणुका स्वबळावर लढवले असे ठामपणे सांगितले. तरीही याबाबत भाजप वरिष्ठांचा निर्णय होईल तो अंतिम असेल, असेही त्यांनी स्पष्ट केले.

भाजप सदस्य नोंदणी ३ लाखांवर..

सातारा जिल्हा हा महायुतीचा बालेकिल्ला झाला आहे. सध्या जिल्ह्यात भाजपची सदस्य नोंदणी सुरू आहे. आतापर्यंत ३ लाख २० हजार सदस्यांची नोंदणी पूर्ण झाली. तसेच १० हजार सक्रीय सदस्य करायचे आहेत. जिल्ह्यात भाजपची ताकद वाढत आहे, अशी माहितीही यावेळी जिल्हाध्यक्ष धैर्यशील कदम यांनी दिली.

Web Title: BJP will contest local body elections on its own in Satara, district president informed

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.