उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या जिल्ह्यात भाजपकडून शिंदेसेनेची कोंडी, स्वबळावर निवडणुकीची रणनीती
By हणमंत पाटील | Updated: June 14, 2025 15:24 IST2025-06-14T15:24:10+5:302025-06-14T15:24:45+5:30
विरोधकांना बळ, भाजपने मुंबई व पुणे या महानगरानंतर सातारा व सांगली जिल्ह्याकडे मोर्चा वळविला

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या जिल्ह्यात भाजपकडून शिंदेसेनेची कोंडी, स्वबळावर निवडणुकीची रणनीती
हणमंत पाटील
सातारा : लोकसभा व विधानसभेला महायुतीचा धर्म पाळणाऱ्या भाजपने राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठी रणनीती बदलली आहे. मुंबई, पुण्यानंतर आता सातारा जिल्ह्यातील स्वबळावर निवडणुकीची तयारी सुरू आहे. पालकमंत्री शंभूराज देसाई यांचे विरोधक सत्यजितसिंह पाटणकर यांना भाजपने प्रवेश दिला. त्यामागे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या पक्षाची त्यांच्याच जिल्ह्यात कोंडी करण्याची भाजपची रणनीती असल्याचे दिसून येते.
केंद्र व राज्यात भाजपच्या नेतृत्वाखाली महायुतीची सत्ता आहे. तसेच, शत-प्रतिशत भाजप हा पक्षाचा नारा आहे. त्यामुळे भाजपने तळागाळात पोहोचण्यासाठी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचा मुहूर्त साधला आहे. आगामी जिल्हा परिषद, नगरपालिका व नगरपंचायतीच्या निवडणुकीच्या प्रभाग रचनाचे आदेश आले आहेत. त्यामुळे भाजपने मुंबई व पुणे या महानगरानंतर सातारा व सांगली जिल्ह्याकडे मोर्चा वळविला आहे.
गेल्या ४५ वर्षांपासून साताऱ्यातील पाटण विधानसभा मतदारसंघात पालकमंत्री शंभूराज देसाई व सत्यजितसिंह पाटणकर ही दोन्ही घराणी एकमेकांचे कट्टर विरोधक आहेत. १९८० मध्ये तत्कालीन आमदार बाळासाहेब देसाई यांच्याविरोधात विक्रमसिंह पाटणकर यांनी पहिल्यांदा बंडखोरी केली. तेव्हापासून पाटण विधानसभा निवडणूक देसाई विरुद्ध पाटणकर अशी लढत सुरू आहे.
सध्या शिंदेसेनेचे पर्यटनमंत्री शंभूराज देसाई हे सातारा जिल्ह्याचे पालकमंत्री आहेत. त्यांच्याविरोधात २०२४ ची विधानसभा निवडणूक पाटणकर यांनी लढविली. आता आगामी निवडणुकीच्या तोंडावर त्यांनी राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाला सोडून भाजपमध्ये प्रवेश केला. त्यानंतर दुसऱ्याच दिवशी ‘आम्ही गुहावटी मार्गे भाजपसोबत आलो नाही,’ अशी जहरी टीका त्यांनी देसाई यांच्यावर केली. त्यामुळे पाटण तालुक्यासह जिल्ह्यातील विविध ठिकाणी स्थानिक स्वराज्य संस्थांची निवडणूक महायुतीत रंगण्याची शक्यता आहे.
नेत्यांना भेटल्यानंतर भूमिका मांडणार : शंभूराज देसाई
आमचे तीन पिढ्यांचे राजकीय मतभेद आहेत. तरीही त्यांचा महायुतीतील मोठ्या पक्षात प्रवेश झाला. मी शिस्तबद्ध शिवसैनिक आहे. मला जे बोलवायचे आहे, ते मुख्यमंत्री फडणवीस साहेब व आमचे नेते उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब यांच्या कानावर घालणार आहे. या दोन्ही नेत्यांची भेट झाल्यानंतर माझी भूमिका मांडणार आहे, अशी प्रतिक्रिया शंभूराज देसाई यांनी दिली.
जिल्ह्यातील महायुतीचे विधानसभेचे संख्याबळ
- भाजप : ४ आमदार (दोन मंत्री)
- राष्ट्रवादी (अजित पवार) : २ आमदार (एक मंत्री)
- शिंदेसेना : २ आमदार (एक मंत्री)