‘पुणे पदवीधर’साठी भाजपकडून चाचपणी, साताऱ्यातून तीन इच्छुक चर्चेत..
By दीपक देशमुख | Updated: September 16, 2025 18:37 IST2025-09-16T18:36:38+5:302025-09-16T18:37:01+5:30
उमेदवारीसाठी रस्सीखेच: महायुती की स्वतंत्र लढणार ?

‘पुणे पदवीधर’साठी भाजपकडून चाचपणी, साताऱ्यातून तीन इच्छुक चर्चेत..
दीपक देशमुख
सातारा : विधान परिषदेच्या पुणे पदवीधर मतदारसंघाच्या मतदार याद्या नव्याने तयार करण्याचा कार्यक्रम जाहीर झाला. त्यामुळे सातारा जिल्ह्यात भाजपाने मतदार नोंदणी अभियान सुरू केले असून; संभाव्य उमेदवारांची चाचपणीही सुरू आहे. गतवेळी महाविकास आघाडीसमोर एकाकी लढलेल्या भाजपाची स्थिती यावेळी पाचही जिल्ह्यांत चांगली आहे. सातारा जिल्ह्यातून भाजपने केलेली संघटनात्मक बांधणी पाहता सातारा जिल्ह्यातून उमेदवारीसाठी रस्सीखेच आहे.
सातारा, सांगली, कोल्हापूर, सोलापूर आणि पुणे अशा पाच जिल्ह्यांचे कार्यक्षेत्र असलेल्या या मतदारसंघांत कोणत्याही राजकीय नेत्याचे एकहाती नियंत्रण अथवा संपर्क कठीण आहे. कारण पदवीधर मतदार विखुरलेले असतात. तथापि, पक्षीय संघटनांची साथ असेल, तर उमेदवारांची थोडी कमी दमछाक होऊ शकते. सर्वच पक्षांच्या राजकीयविरहीत संघटना आहेत. या संघटनांमध्ये काम करणाऱ्या नेतृत्वांना संधी मिळण्याची मागणी कार्यकर्त्यांमधून होत आहे.
महायुती की स्वतंत्र लढणार ?
गत निवडणुकीत महाविकास आघाडीतील पक्ष एकत्र आल्यामुळे भाजपचे उमेदवार संग्राम देशमुख यांचा पराभव करून राष्ट्रवादीचे उमेदवार अरुण लाड विजयी झाले. परंतु, गेल्या पाच वर्षांत पश्चिम महाराष्ट्रातील राजकीय परिस्थिती बदललेली आहे. विधानसभेनंतर भाजपची सर्व पाच जिल्ह्यांवर पकड वाढली आहे. आता भाजप स्वतंत्र की महायुती लढणार ? यावरही बरीच राजकीय गणिते अवलंबून आहेत. सध्या तरी भाजपने एकला चलो रे पदवीधर नोंदणी कार्यक्रम राबवला आहे.
साता-यातून तीन इच्छुक चर्चेत...
- मंत्री जयकुमार गोरे यांचे बंधू शेखर गोरे हे विधानसभेला इच्छुक आहेत. तथापि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्यांना ‘शब्द’ दिल्यामुळे त्यांनी विधानसभेतून माघार घेतली. मात्र, जयकुमार गोरे यांनी यासंदर्भात वचन देणारे अन् घेणारे यांच्यामध्ये काय चर्चा झाली? हे माहीत नसल्याचे सांगून सावध पवित्रा घेतला आहे. तथापि, घोडामैदान जवळ आल्यानंतर शेखर गोरे रणांगणात उतरण्याच्या तयारीत आहेत.
- पुसेसावळी येथील भाजपचे माजी जिल्ह्याध्यक्ष धैर्यशील कदम हेही विधानसभेला इच्छुक होते. मात्र, गत विधानसभेला मनोज घोरपडे यांना उमेदवारी मिळाली. त्यामुळे विधान परिषदेच्या निमित्ताने पुन्हा एकदा कदम आमदारकीसाठी दावा करू शकतात.
- विक्रम पावसकर यांनी भाजप पक्षामध्ये गेल्या अनेक वर्षांपासून चांगले संघटन बांधले आहे. सातारा जिल्ह्यासह कोल्हापूर, पुणे, कोल्हापूर व पुणे जिल्ह्यांत त्यांनी भाजपतून संघटनात्मक काम केले आहे. याशिवाय संघटनात्मक कामगिरी करणारे भाजपतून रामकृष्ण वेताळ, अमित कुलकर्णी तसेच महिलांमध्ये सुरभी भोसले व प्रिया शिंदे आदींच्या नावाची चर्चा होऊ लागली आहे.