मराठा आरक्षणासाठी साताऱ्यात वकिलांची दुचाकी रॅली, उद्या ट्रॅक्टर रॅली

By सचिन काकडे | Published: November 1, 2023 05:26 PM2023-11-01T17:26:46+5:302023-11-01T17:27:16+5:30

सातारा : मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी सातारा जिल्ह्यात सुरू असलेल्या आंदोलनाला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत असून, या आंदोलनाच्या समर्थनार्थ बुधवारी सातारा ...

Bike rally of lawyers in Satara for Maratha reservation, tractor rally tomorrow | मराठा आरक्षणासाठी साताऱ्यात वकिलांची दुचाकी रॅली, उद्या ट्रॅक्टर रॅली

मराठा आरक्षणासाठी साताऱ्यात वकिलांची दुचाकी रॅली, उद्या ट्रॅक्टर रॅली

सातारा : मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी सातारा जिल्ह्यात सुरू असलेल्या आंदोलनाला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत असून, या आंदोलनाच्या समर्थनार्थ बुधवारी सातारा जिल्हा बार असोसिएशनच्या वतीने शहरात दुचाकी रॅली काढण्यात आली. या रॅलीमध्ये पाचशेहून अधिक वकील सहभागी झाले.

आंतरवाली सराटी (जि. जालना) येथे मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटील यांनी उपोषण सुरू केले आहे. या उपोषणाला संपूर्ण राज्यातून मराठा बांधवांचा पाठिंबा मिळत आहे. सातारा जिल्ह्यातही आरक्षणासाठी मराठा समाज आक्रमक झाला असून आंदोलने सुरू झाली आहेत. गावागावांमध्ये सर्वपक्षीय राजकीय नेत्यांना प्रवेश बंदी करण्यात आली असून, सातारा जिल्हा मराठा क्रांती मोर्चाच्यावतीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर साखळी आंदोलन सुरु करण्यात आले आहे. 

क्रांती मोर्चाच्या वतीने मंगळवारी जिल्हा बंदची हाक देण्यात आली होती. या बंदला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाल्यानंतर बुधवारी जिल्हा बार असोसिएशनच्या वतीने शहरात दुचाकी रॅली काढण्यात आली. सकाळी साडेअकरा वाजता सातारा जिल्हा न्यायालयाच्या आवारातून रॅलीला सुरुवात झाली. यानंतर रॅली जिल्हाधिकारी कार्यालयमार्गे पोवई नाका येथे आली. येथे  छत्रपती शिवरायांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.

यानंतर रॅली राजपथाकडे मार्गस्थ झाली. गोलबागेला वळसा घालून  मोती चौक ,पाचशे एक पाटी, पोलिस मुख्यालय मार्गे पोवई नाका आणि तिथून जिल्हाधिकारी कार्यालय असा रॅलीचा मार्ग होता. वकिलांच्या शिष्टमंडळाने मराठा क्रांती मोर्चा समन्वयक समितीच्या पदाधिकाऱ्यांची भेट घेतली. मराठा समाजाला आरक्षण मिळालेच पाहिजे ही सध्याची गरज आहे. त्या दृष्टीने संपूर्ण सातारा जिल्हा बार असोसिएशन आपल्या पाठीमागे ठामपणे उभे आहे, असे आश्वासन असोसिएशनच्या वतीने समितीला देण्यात आले.

उद्या ट्रॅक्टर रॅली..

मराठा आरक्षणाच्या समर्थनार्थ उद्या गुरुवारी (दि. २) मराठा क्रांती मोर्चा, राजधानी साताराच्या वतीने ट्रॅक्टर रॅलीचे आयोजन करण्यात आले आहे. सकाळी ११ वाजता बॉम्बे रेस्टॉरंट चौक येथून या रॅलीस प्रारंभ होईल. बॉम्बे रेस्टॉरंट, जिल्हा परिषद, गोडोली, पोवई नाका, नगरपालिका, राजवाडा, खनआळी, पोलिस मुख्यालय, शिवतीर्थ ते आंदोलन स्थळ असा रॅलीचा मार्ग असणार आहे.

Web Title: Bike rally of lawyers in Satara for Maratha reservation, tractor rally tomorrow

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.