मोठ्या राजेंचं ‘पोट’ छोट्या राजेंचं ‘वजन’
By Admin | Updated: November 11, 2014 23:19 IST2014-11-11T22:25:08+5:302014-11-11T23:19:56+5:30
सुपरहिट--साताऱ्यातलं बेकायदेशीर बांधकाम हटवलं जातंय.’

मोठ्या राजेंचं ‘पोट’ छोट्या राजेंचं ‘वजन’
पृथ्वीतलावरील सातारानगरीत काहीतरी अघटीत घडतंय, याची कुणकूण स्वर्गलोकी लागली. तत्काळ इंद्रदरबारात नारदमुनींना बोलावून घेण्यात आलं. वीणा वाजवत मुनी दाखल होताच देवाधिराजांनी विचारलं, ‘साताऱ्यात म्हणे कसलातरी खणखणाट होतोय. काय प्रकार आहे हा मुनीजी?’ अंतचक्षूसमोर ‘बापटांच्या हातातला हातोडा’ आणत नारद उत्तरले, ‘महाराऽऽज... साताऱ्यातलं बेकायदेशीर बांधकाम हटवलं जातंय.’ आश्चर्यचकीत होऊन देवाधिराजांनी पुन्हा विचारलं, ‘पण त्यासाठी दगडांचा वापर का? तेव्हा जरा तुम्ही समक्ष तिथं जाऊन या. प्रत्यक्ष घटना पाहून नंतर आम्हाला हालहवाल सांगा.’
मग काय... मुनी ‘थेट’ सातारनगरीत दाखल जाहले. इथलं राजकीय वातावरण तंग होतं. (अधूनमधून असतं म्हणे!) सर्वसामान्य सातारकरही चिडीचूप होते. (ते तर नेहमीच असतात म्हणे!) वाटेत ‘भोसल्यांचे राजू’ भेटले. त्यांच्या पुढं दोन-चार डंपर अन् मागं पाच-सहा जेसीबी. ‘एवढा लवाजमा कशासाठी?’ असा सवाल मुनींनी करताच ‘बारा-तेरा’ नंबर गाडीतून उतरत राजू उत्तरले, ‘दगडाखालचा हात काढायचा होता बाबाराजेंचा. हुश्श्ऽऽ कसातरी काढला बुवा यंदा.’
‘आता नेमका कोणत्या दगडाखाली हात अडकला होता?’ हा प्रश्न विचारावा म्हणून नारदांनी ‘कदमांच्या अवी’ला गाठलं. पण ते साताऱ्यात आणलेली सर्वात पहिली ‘डस्टर’ लोकांना दाखविण्यातच दंग झालेले. जावळीतले सभापतीही ‘सुहास’वदनानं ‘सातबारा’वर बाबा गटाचं नाव चढविण्यात रमलेले. (कधीकाळी गिरींचे हेच हात म्हणे शशिकांतरावांसाठी शिक्के मारण्यात मग्न असायचे. काळाचा महिमा. दुसरं काय?)
‘साताऱ्यात सारं नवलच घडतं!’ असं मनातल्या मनात म्हणत मुनी पुढं सरकले. पुढच्या चौकात ‘गळ्यात स्टेथोस्कोप’ घातलेले ‘सुरेश’राव भेटले. ‘काय डॉक्टरसाहेब.. सिव्हिल सोडून एस.पी. आॅफीसकडं का चाललात?’ या प्रश्नावर जगदाळे नेहमीप्रमाणं खळखळून हसले; परंतु त्यांच्या नजरेत ‘मोठ्या राजें’च्या तब्येतीविषयीची काळजी स्पष्टपणे जाणवत होती. मुनींनी खोचकपणे विचारलं, ‘काय झालं? गाडी हायवेवर पुन्हा कुठं धडकली की काय?’ डॉक्टर चपापले. ‘अंधारातल्या गोष्टी साताऱ्यात एवढ्या फटाफट कशा काय कर्णोपकर्णी पसरतात?’ असा प्रश्न त्यांच्यासमोर उभा ठाकला. ‘आज महाराज उपोषणाला बसलेत नां, म्हणून तिकडं चाललोय.’ डॉक्टरांनी माहिती देताच मुनी दचकले. ‘आता हे काय नवीन खूळ?’ या प्रश्नावर डॉक्टरांनी काहीच उत्तर दिलं नाही. कारण ‘महाराजांच्या मनाचा ठाव जिथं भल्या-भल्यांना लागला नाही, तिथं आपण बापुडे कोण?’ हे त्यांना पुरतं ठावूक होतं.
एवढ्यात समोरून बनकरांसोबत ‘दामले’ आले. त्यांच्या पाठीवर भलं मोठ्ठं गाठोडं होतं. त्यात वेगवेगळ्या रंगाचे ‘हेल्मेट’ दिसत होते. ‘पालिकेची नोकरी सोडून आता शिरस्त्राण विकायचा बिझनेस सुरू केलाय की काय अरविंदा?’ असं मुनींनी विचारताच दामले कसंनुसं हसले. ‘दोन्ही ठिकाणी तारेवरची कसरत’ करायची सवयच लागल्यानं त्यांनी नेहमीप्रमाणं वेळ मारून नेली. ‘सुरुचीवरनं दगडं पडली तर जलमंदिरवर सुरक्षा हवी ना!’ असं सांगून ते हळूच पुढं सरकले. ‘भलेही छोट्या राजेंनी दगडफेक करायची ठरवलं तरी त्यांना दगडं आणून देणार कोण?’ असा गहन प्रश्न नारदमुनींना पडला; कारण त्यांचे बरेच कार्यकर्ते आजकाल ‘आपापल्या कामात’ गुंतलेले. छोट्या राजेंच्याच जीवावर मोठे झालेले; पण आता स्वत:तच मश्गुल बनलेले.
नारदमुनी विचार करत-करत डॉक्टर अन् बनकरांसोबत उपोषणस्थळाकडं निघाले. ‘पण काय हो डॉक्टर... एक दिवसाच्या उपोषणानं महाराजांचं वजन किती कमी होणारंय?’ डॉक्टरांऐवजी दत्तोबांनीच मिस्किलपणे उत्तर दिलं, ‘उलट वजन वाढणारंय. गेले एक महिनाभर छोट्या राजेंनी गुंडगिरीविरुध्द आवाज उठविला होता नां. तेव्हा त्यांचं ‘वजन’ कमी करण्यासाठी हा प्लॅन ठरलाय. म्हणूनच आज एक दिवस आम्ही स्वत:च्या पोटाला मारायचं ठरवलंय. आलं का लक्षात?’
सचिन जवळकोटे