जनावरांच्या बाजारात गाढवांनाच ‘बोली’
By Admin | Updated: April 30, 2016 00:54 IST2016-04-29T23:05:32+5:302016-04-30T00:54:44+5:30
शेतकरी हतबल : कवडीमोल झाली जनावरे; गाय, म्हैस केवळ पाच हजारांत तर गाढव वीस हजाराला; म्हणे गाढवांना दुष्काळ नसतो

जनावरांच्या बाजारात गाढवांनाच ‘बोली’
सातारा : जागतिक स्तरावर भारत हा शेतीप्रधान देश म्हणून संबोधला जातो; पण त्याच देशातील कृषी व्यवस्था संकटात सापडली आहे. दुष्काळामुळे शेती उत्पादन घटले आहे; पण शेतकऱ्यांचे आर्थिक स्थर उंचाविण्यासाठी पूरक ठरणारी जनावरे ही आता कवडीमोल भावाने विकली जात आहेत. अशा कोंडीत सापडलेल्या शेतकऱ्याच्या जनावरांनाही भाव नाही. उलट आठवड्याच्या बाजारात गाढवांनाच अधिक बोली लागू लागली आहे.
संपूर्ण राज्यात पडलेल्या भीषण दुष्काळामुळे शेतकरी वर्ग हैराण झाला आहे. जगायचे कसे हा मोठा प्रश्न त्यांच्या पुढे पडला आहे. शेती आहे पण पाणी नाही. अशा अवस्थेत सापडेलला शेतकरी दिशाहिन झाला आहे. दैनंदिन शेतीची कामे करण्याची क्षमता त्याच्यात आता उरली नाही. जीवापाड प्रेम केलेली व जपलेली शेती पाण्याविना नुसतीच कोरडी पाहून ‘दु:ख सांगू कोणाला,’ अशी अवस्था त्याची झाली आहे. निसर्गाच्या आशेवर जगणाऱ्या या शेतकऱ्याचे जीवन मातीमोल ठरत आहे. शेतीवर आधारित असणारे कुटुंब व पोटाच्या मुलाबाळाप्रमाणे सांभाळलेली जनावरे ही आता त्याला ओझे वाटू लागली आहेत. पाणी नाही चारा नाही. यामुळे जनावरांचे ही हाल होऊ लागले आहेत. हे हाल आता शेतकऱ्यालाही बघवत नाहीत. डोळ्या देखत जनावरे चाऱ्याविना, पाण्याविना तडफडत आहेत. हे दु:ख त्याला उघड्या डोळ्यांनी पाहवे लागत आहे.
एकेकाळी जनावरांच्या जीवावर फुलवलेली शेती केवळ दुष्काळामुळे या जनावरांना आठवड्याच्या बाजारात विक्रीला काढावे लागत आहे. गोठ्यातील गाई, म्हैस, बैल यांच्याकडे पाहून अनेक वेळा शेतकऱ्याचे मन भरून येते; पण तो ही आता परिस्थितीपुढे हातबल झाला आहे.
कर्जापायी नामशेष होत असलेले शेतकरी आलेली परिस्थती पाहण्यापलीकडे काहीच करू शकत नाहीत. शेती उत्शधपन्न नाही; पण कर्जाचा डोंगर वाढत आहे. अनेक वेळा जनावरांची विक्री करायचा प्रयत्न करूनही योग मोबदला मिळत नाही. गाय, म्हैस, बैल यापेक्षा आठवड्याच्या बाजारात आता दलालांकडून गाढवांची बोली अधिक लागत आहे. हे दु:ख ही आता त्याला सहन करावे लागत आहे.
वास्तविक शेतकऱ्यांच्या जीवनात जनावरांचे मोल अनमोल असताना केवळ ओढवलेल्या आजच्या परिस्थितीने जनावरांची किंमत कवडीमोड ठरत आहे. दुष्काळामुळे ओढलेल्या संकटात इच्छा नसतानाही आपली जनावरे विक्रीला काढावी लागत आहेत.
काळाच्या ओघात शेतकऱ्यांच्या जनावरांना किंमत नाही; पण ओझी वाहणाऱ्या गाढवानाच मात्र किंमत वाढली आहे. हे दुष्काळजन्य परिस्थितीने सिद्ध केले आहे.
जनावरांच्या बाजारात शेतकऱ्याच्या जनावरापेक्षा दलालाच्या शब्दाला किंमत अधिक असल्याचे दिसून येते. दुष्काळाशी सामना करणारा शेतकरी हतबल होऊन जनावरे मिळेल त्या किमतीला विक्रीला काढत आहे. जनावराचे हाल होण्यापेक्षा विक्रीतून त्याची मुक्तता करण्याकडेच शेतकऱ्याचा कल आहे. बाजारात जनावरे विक्रीसाठी शेतकरी मोठ्या संख्येने घेऊन जात आहेत. निसर्गानेच दगा दिल्याने कोणाच्या भरवशावर जनावरे ठेवायची, असा आक्रोश करीत शेतकरी स्वत:च्या नशिबालाच दोष देत आहेत. शेतकरी मिळेल तो भाव पदरात पाडून स्वत:ची मुक्तता करीत आहे. (प्रतिनिधी)
शेतकऱ्यांची नेहमीच उपेक्षा होत असते. जीवापाड जपलेल्या जनावरांना कवडीमोल दरात विकताना शेतकऱ्यांना परवडणारे नसते. मात्र यापेक्षा आणखी त्यांचे हाल व्हायला नको. म्हणून जनावरांना विकणे शेतकरी पसंत करत आहेत.
- श्रीरंग काटेकर (सामाजिक कार्यकर्ते, सातारा )