भिजव पांडुरंगा तहानलेलं रान रे..!
By Admin | Updated: June 30, 2014 00:31 IST2014-06-30T00:23:00+5:302014-06-30T00:31:23+5:30
चांदोबाचा लिंब : लाखो वारकऱ्यांच्या उपस्थितीत रंगले पहिले रिंगण

भिजव पांडुरंगा तहानलेलं रान रे..!
सचिन गायकवाड ल्ल राहिद सय्यद /तरडगाव/लोणंद
नको पांडुरंगा
मला सोन्या चांदीचे दान रे..।
फक्त भिजव पांडुरंगा
हे तहानलेलं रान रे..।
अशी आर्त साद घालत चांदोबाचा लिंब येथे संत शिरोमणी ज्ञानोबा माउली पालखी सोहळ्यातील पहिले उभे रिंगण आज, रविवारी पार पडले. रिंगण पूर्ण झाल्यानंतर ज्या मार्गावरून माउलींचे अश्व गेले तेथे वारकरी नतमस्तक झाले आणि आपल्या हाताने ललाटी माती लावली.
लाडक्या विठूरायाच्या दर्शनासाठी निघालेला वैष्णवांचा मेळा सातारा जिल्ह्यातून मार्गक्रमण करीत आहे. लोणंद येथील मुक्कामानंतर सोहळा फलटण तालुक्यातील तरडगाव मुक्कामी निघाला आणि लोणंदकरांनी भक्तिमय वातावरणात निरोप दिला. तीन वाजता सोहळा फलटण तालुक्यात आला आणि प्रत्येकाला चांदोबाचा लिंब येथे होणाऱ्या पहिल्या उभे रिंगणाची उत्सुकता लागली. लोणंद-तरडगाव मार्गावर लाखो वारकरी जमू लागले.
बरोबर चार वाजता चांदोबाचा लिंब येथे सोहळ्यातील माउलींचा रथ येऊन थांबला. चोपदारांनी सूचना करताच वारकरी रस्त्याच्या दोन्ही बाजूला उभे राहिले आणि हरिनामाचा गजर सुरू झाला.
सर्वांत पुढे असलेले माउली आणि चोपदारांचे अश्व रथापुढे धावले. अश्व पुढे गेले आणि ते पुन्हा रथाच्या दिशेने मागे फिरले आणि लाखो वारकऱ्यांनी विठूरायाचा गजर सुरू केला. ज्या मार्गावरून माउलींचे अश्व गेले तेथे रस्त्याच्या दुतर्फा असलेले वारकरी नतमस्क झाले आणि ललाटी माती लावली.