खुशखबर! सातारा जिल्हा परिषदेतील ४९७ कर्मचाऱ्यांना वरिष्ठ वेतनाचा लाभ

By नितीन काळेल | Published: November 21, 2023 06:21 PM2023-11-21T18:21:54+5:302023-11-21T18:23:54+5:30

आश्वासित प्रगती योजना : एकाच दिवसात मंजूर; वर्ग तीनचे कर्मचारी

Benefit of senior salary to 497 employees of Satara Zilla Parishad | खुशखबर! सातारा जिल्हा परिषदेतील ४९७ कर्मचाऱ्यांना वरिष्ठ वेतनाचा लाभ

खुशखबर! सातारा जिल्हा परिषदेतील ४९७ कर्मचाऱ्यांना वरिष्ठ वेतनाचा लाभ

सातारा : सातारा जिल्हा परिषदेमार्फत विविध संवर्गातील वर्ग तीनच्या ४९७ कर्मचाऱ्यांना सुधारित सेवांतर्गत आश्वासित प्रगती योजनेचा लाभ मंजूर झाला आहे. विशेष म्हणजे एकाच दिवशी ही प्रक्रिया झालेली आहे. यामुळे सबंधितांना वरिष्ठ पदाच्या वेतनाचा लाभ मिळणार असल्याने कर्मचारी वर्गात समाधान दिसून येत आहे.

महाराष्ट्र शासन वित्त विभागाच्या २ मार्च २०१९ च्या शासन निर्णयाद्वारे सातव्या केंद्रीय वित्त आयोगाचा शिफारस अहवाल विचारात घेऊन, राज्य शासकीय आणि जिल्हा परिषद कर्मचाऱ्यांना सुधारित सेवांतर्गत आश्वासित प्रगती योजना लागू करण्यात आलेली आहे. या योजनेंतर्गत कर्मचाऱ्यास त्याच्या सलग सेवेच्या १०, २० आणि ३० वर्षानंतर तीन लाभ या योजनेंतर्गत अनुज्ञेय आहेत. याबाबत जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी ज्ञानेश्वर खिलारी यांनी २० नोव्हेंबर रोजीच पदोन्नती समितीची बैठक घेतली. तसेच एकाच दिवशी ४९७ कर्मचाऱ्यांना आश्वासित प्रगती योजनेचा लाभ मंजूर केला. यामुळे कर्मचाऱ्यांना वरिष्ठ पद वेतनाचा लाभ होणार आहे.

जिल्हा परिषदेतील वर्ग तीनच्या ४९७ कर्मचाऱ्यांना आश्वासित प्रगती योजनेचा लाभ मिळणार आहे. यामध्ये आरोग्य विभागांतर्गत आरोग्य सेवक (पुरुष) २९, आरोग्य सेवक (महिला) ७४, आरोग्य सहाय्यक (पुरुष) ४, आरोग्य सहाय्यक (महिला) २१, आरोग्य पर्यवेक्षक (पुरुष) ९, आरोग्य पर्यवेक्षक (महिला) १ यांना लाभ मंजूर झाला. त्याचबरोबर आरोग्य सहाय्यक (महिला एनएम) ५, औषध निर्माण अधिकारी १०, कुष्ठरोग तंत्रज्ञ १, बांधकाम विभाग कनिष्ठ अभियंता ६, वाहन चालक १, वरिष्ठ यांत्रिकी १, लिफ्टमन १, रायटिंग मुकादम १, मजूर १२, ग्रामपंचायत विभागात विस्तार अधिकारी (पं) ६, ग्रामविकास अधिकारी १८. सामान्य प्रशासन विभागात सहाय्यक प्रशासन अधिकारी १, विस्तार अधिकारी (सांख्यिकी) २. वाहन चालक १, परीचर २०, शिक्षण विभागात विस्तार अधिकारी ९, प्राथमिक शिक्षक (वरिष्ठ श्रेणी) २३९, पशुसंवर्धन विभागामधील पशुधन पर्यवेक्षक १६, सहाय्यक पशुधन विकास अधिकारी ४, व्रणोपचारक ३ आणि ग्रामीण पाणी पुरवठातील दोघांनाही लाभ मंजूर झालेला आहे.

जिल्हा परिषद कर्मचाऱ्यांना आस्थापना विषयक अनुज्ञेय असलेले सर्व लाभ वेळीच मंजूर करण्यासाठी जिल्हा परिषद प्रशासन नेहमीच प्रयत्नशील आहे. त्यामुळे जिल्हा परिषदेने एकाच वेळी ४९७ कर्मचाऱ्यांना आश्वासित प्रगती योजनेचा लाभ मंजूर केला आहे. यापुढील काळात जिल्हा परिषद कर्मचाऱ्यांच्या सेवाविषयक बाबींचा निपटारा वेळेत करण्यासाठी प्रशासन प्रयत्नशील राहिल. - ज्ञानेश्वर खिलारी, मुख्य कार्यकारी अधिकारी

Web Title: Benefit of senior salary to 497 employees of Satara Zilla Parishad

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.