Satara: दुष्काळी भागात साकारतोय प्रति कास तलाव!, पर्यटनासाठी मिळणार चालना
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 11, 2025 13:30 IST2025-09-11T13:30:17+5:302025-09-11T13:30:44+5:30
वरूड तलावाचा चेहरामोहरा बदलण्यासाठी काम सुरू

Satara: दुष्काळी भागात साकारतोय प्रति कास तलाव!, पर्यटनासाठी मिळणार चालना
रशिद शेख
औंध : खटाव तालुक्यातील औंध-वरुड रस्त्याला असणारा वरुड गावचा मुख्य पाण्याचा स्रोत असलेल्या तलावाचे काम व सुशोभीकरण सध्या सुरू असून, या तलावाचा चेहरा-मोहरा बदलून पर्यटक आवर्जून थांबतील, अशा पद्धतीने नियोजन आहे व साताऱ्यातील प्रति कास तलाव तयार करण्याच्या दृष्टीने वाटचाल सुरू आहे. यासाठी अमेरिकेतील क्लीन इंटरनॅशनल संस्था अन् से-ट्रीज संस्थेने पुढाकार घेतला आहे.
१९७२ च्या दुष्काळात रोजगार हमी योजनेतून कोणत्याही मशिनरीचा वापर न करता केवळ मजुरांच्या साह्याने तलावाची निर्मिती करण्यात आली होती. या तलावात कसेबसे सप्टेंबर ते ऑक्टोबरपर्यंत पाणी राहात असे, त्यानंतर कोरडा पडत होता. त्यामुळे उन्हाळ्यात या गावाला टँकरने पाणीपुरवठा सुरू असायचा. वरुड ग्रामस्थांनी २०१९ साली पाणी फाउंडेशनमध्ये सहभागी होऊन अनुलोम संस्था, जलयुक्त शिवार योजना, शिवार संस्था यांच्या माध्यमातून पहिल्यांदा या तलावात होणारी गळती थांबवण्यासाठी ३२ हजार ट्रॉली गाळ काढला.
२०१९ ते २०२४ पर्यंत वरुड गावाने जलसंधारणाच्या कामासाठी खूप काम केले. या दोन्हीही संस्थांच्या माध्यमातून एप्रिल महिन्यात तलावाच्या सुशोभीकरणाच्या कामाला सुरुवात झाली. भरावातून होणारी गळती थांबवणे, गाळ काढणे, दगडाचे पीचिंग करण्यास सुरुवात झाली. ४८० मीटर भरावाला शून्य पॉइंटवरून २० ते २२ फूट खोल चर मारून ५०० मायक्रोन जाडीचा कागद टाकण्यात आला आहे. त्यामुळे गळती थांबणार आहे तसेच भरावाच्या बाजूने रिंग बेड तयार करण्यात येणार आहे, त्यामुळे पर्यटकांना संपूर्ण तलावाला फेरफटका मारता येणार आहे. तसेच बगीचा, झुलता पूल, रोषणाईही करण्यात येणार आहे. त्यामुळे तलावाच्या सौंदर्यात भर पडणार आहे.
अनेक शासकीय अधिकाऱ्यांची भेट..
वरुड गावाला शेकडो शासकीय अधिकाऱ्यांनी भेट देऊन कामाचे कौतुक केले आहे. जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी याशनी नागराजन यांनी तर या कामाबद्दल विशेष कौतुक केले आहे.
दुष्काळी कलंक असलेल्या खटाव तालुक्यात एक निसर्गरम्य ठिकाण व्हावे, यासाठी काम सुरू आहे. आम्हा सर्वांचा तो ड्रीम प्रोजेक्ट आहे. काम पूर्ण झाल्यावर प्रति कास तलावाचे दर्शन इथे होणार आहे. - चैतन्य जोशी, राज्य समन्वयक, से-ट्रीज संस्था