मृगाचा पेरा साधण्यासाठी बळीराजा शेतीच्या कामात व्यस्त...
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 22, 2021 04:25 IST2021-06-22T04:25:41+5:302021-06-22T04:25:41+5:30
कातरखटाव : खटाव तालुक्यातील कातरखटाव परिसरात अवकाळी पावसाच्या तीन सरी कोसळल्यामुळे शिवारात पेरणीपूर्व मशागतीच्या कामात बळीराजाची धांदल उडालेली ...

मृगाचा पेरा साधण्यासाठी बळीराजा शेतीच्या कामात व्यस्त...
कातरखटाव : खटाव तालुक्यातील कातरखटाव परिसरात अवकाळी पावसाच्या तीन सरी कोसळल्यामुळे शिवारात पेरणीपूर्व मशागतीच्या कामात बळीराजाची धांदल उडालेली आहे. भागात ७० टक्के पेरणी पूर्ण झाली असली तरी काही ठिकाणी पावसाने हुलकावणी दिल्यामुळे शिवारात कही खुशी-कही गम दिसून येत आहे.
तालुक्याच्या विविध भागात पेरणीची धांदल उडाली आहे. ज्या ठिकाणी माॅन्सूनपूर्व चांगला पाऊस झाला आहे, अशा भागात सोयाबीन, मका, उडीद, मटकी, घेवडा, भुईमूग या पिकांची पेरणी जोमाने सुरु झाली आहे. दुसरीकडे कान्हरवाडी, हिवरवाडी, तरसवाडी या भागात पावसाने हुलकावणी दिल्यामुळे तीस टक्के पेर झाली आहे. काही ठिकाणी शेती मशागत करून ठेवल्याचे दिसून येत आहे. गेली दहा ते बारा दिवसांपासून मृग नक्षत्र सुरु झाले असले तरी मृगाचा पाऊस झाला नसल्यामुळे काही शेतकऱ्यांनी पावसाची वाट न पाहता जमिनीत असेल त्या ओलीवर पेरणी सुरु केली आहे.
काही शेतकऱ्यांनी बी-बियाणे घरात आणून ठेवली आहे. पेरणीसाठी पावसाची वाट पाहत आहेत. त्यामुळे शेतात सरी सोडून जमीन तयार करणे या कामात बळीराजा व्यस्त दिसत आहे.
सध्या शेतकऱ्यांना शेतीकामासाठी मजुरांचा तुटवडा जाणवू लागला आहे. त्यामुळे घरातील सर्व कुटुंब शेतशिवारात राबत असल्याचे चित्र ग्रामीण भागात दिसून येत आहे. कोरोना या महामारीत अनेक शेतकरी कुटुंबे संकटात सापडली आहेत. या संकटावर मात करीत बळीराजा आपल्या कुटुंबासहित शिवारात काळ्या आईची मशागत करण्यात व्यस्त असल्याचे दिसून येत आहे.
चौकट
बैलजोडीची उणीव... ट्रॅक्टरची धूम
शेतकऱ्यांना सध्या औतासाठी बैलजोडीची उणीव भासत असून पेरणीसाठी औत मिळवताना कसरत करावी लागत आहे. एक काळ असा होता शेतकऱ्याच्या दावणीला बैलाच्या चार-चार जोड्या असायच्या. कालांतराने ग्रामीण भागात अलीकडच्या काळात या तांत्रिक युगात बैलजोडीची संख्या कमी झाल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे शिवारातील सर्जा- राजाची हाळी नामशेष होतं चालली असून ट्रॅक्टरची धूम सर्वत्र चाललेली दिसत आहे.
फोटो
२१कातरखटाव
कातरखटाव परिसरात ट्रॅक्टरच्या साह्याने खरीप हंगामातील मशागतीची कामे शिवारात सुरू झाली आहेत. (छाया : विठ्ठल नलवडे )