Satara: कासारशिरंबेत बिबट्याच्या शिकारीचा प्रयत्न, पाचजण ताब्यात
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 29, 2025 16:18 IST2025-01-29T16:18:16+5:302025-01-29T16:18:45+5:30
सापळ्यातून हिसका देऊन बिबट्याची उसाच्या शेतात धूम

Satara: कासारशिरंबेत बिबट्याच्या शिकारीचा प्रयत्न, पाचजण ताब्यात
कऱ्हाड : कऱ्हाड तालुक्यातील कासारशिरंबे येथे मारुती संभाजी बोंद्रे यांच्या उसाच्या शेतात एक बिबट्या सापळ्यात अडकला होता. याबाबत पोलिस पाटील यांनी वनविभागास कळविल्यानंतर वनविभागाच्या पथकाने घटनास्थळी धाव घेतली; परंतु बिबट्याने सापळ्यातून हिसका देऊन निसटून उसाच्या शेतात धूम ठोकली होती. ही घटना मंगळवारी सायंकाळी उघडकीस आली.
वन कर्मचाऱ्यांनी तपासणी केली असता पाचजणांकडे शिकारीचे साहित्य आढळून आले. चौकशीअंती पाच आरोपी ताब्यात घेऊन शिकारीचा प्रयत्न करणाऱ्याच्या विरुद्ध वन्यजीव संरक्षण अधिनियम १९७२ अन्वये वन गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
प्रकाश बापूराव पवार, सुनील दिलीप पवार, विशाल दिलीप पवार, मिथुन भाऊराव शिंदे, भीमराव बाबूराव पवार (सर्व रा. भालकी, ता. भालकी, जिल्हा बिदर) हे सध्या ऊसतोड मजूर म्हणून काम करीत आहेत. त्यांनी हा शिकारीचा प्रयत्न केला असल्याचे समोर आले आहे. यांच्याकडे दोन बहेली सापळ्यासह तारेचा पिंजरा, टोकदार लोखंडी सळई, लाकडी मूठ असलेली, तीन वाघर, नायलॉन रस्सी, क्लच वायरचा फास, इत्यादी शिकारीचे साहित्य आढळून आले. ते साहित्य ताब्यात घेऊन कारवाई करण्यात आली.
उपवनसंरक्षक सातारा आदिती भारद्वाज यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक वन संरक्षक महेश झांजुर्णे, वनपरिक्षेत्र अधिकारी ललिता पाटील, वनपाल बाबूराव कदम, मानद वन्यजीव रक्षक रोहन भाटे, वनरक्षक दशरथ चिट्टे, अभिनंदन सावंत, कविता रासवे, अतुल कळसे, सतीश पाटील यांनी ही कारवाई केली.