साताऱ्यात वडिलांकडून पाच वर्षाच्या बालिकेवर अत्याचार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 10, 2019 16:19 IST2019-06-10T16:18:03+5:302019-06-10T16:19:08+5:30
पोटच्या पाच वर्षांच्या मुलीवर बापानेच अत्याचार केल्याची खळबळजनक घटना साताऱ्यात उघडकीस आली असून, नात्याला काळीमा फासणाऱ्या या घटनेमुळे नागरिकांमधून तीव्र संताप व्यक्त होत आहे.

साताऱ्यात वडिलांकडून पाच वर्षाच्या बालिकेवर अत्याचार
सातारा : पोटच्या पाच वर्षांच्या मुलीवर बापानेच अत्याचार केल्याची खळबळजनक घटना साताऱ्यात उघडकीस आली असून, नात्याला काळीमा फासणाऱ्या या घटनेमुळे नागरिकांमधून तीव्र संताप व्यक्त होत आहे.
मूळचे शिराळा तालुक्यातील असलेले संबंधित कुटुंबीय साताऱ्यातील एका पेठेमध्ये गेल्या अनेक वर्षांपासून वास्तव्य करत आहे. दोन दिवसांपूर्वी संबंधित मुलीला अचानक त्रास होऊ लागला. त्यामुळे तिच्या आईने तिला विश्वासात घेऊन विचारले असता तिने वडिलांनी केलेला घृणास्पद प्रकार आईसमोर कथन केला.
हे ऐकून मुलीच्या आईला जबर मानसिक धक्का बसला. पतीने पोटच्या मुलीसोबत केलेला प्रकार माणुसकीला काळीमा फासणारा असल्यामुळे मुलीच्या आईने तत्काळ शाहूपुरी पोलीस ठाण्यात धाव घेऊन तक्रार दाखल केली.
पोलिसांनी संबंधित पित्यावर ३७६ बालकांचे लैगिंक अपराधांपासून संरक्षण या अधिनियमाखाली गुन्हा दाखल केला आहे. सहायक पोलीस निरीक्षक शेलार हे या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.