विधानसभेला जनतेकडून पोचपावती मिळेल - मुख्यमंत्री
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 14, 2019 07:00 IST2019-06-14T06:59:40+5:302019-06-14T07:00:01+5:30
शाहू साखर कारखान्याचे संस्थापक स्वर्गीय विक्रमसिंह घाटगे यांच्या अर्ध पुतळा अनावरण समारंभानंतर झालेल्या शेतकरी मेळाव्यात ते बोलत होते.

विधानसभेला जनतेकडून पोचपावती मिळेल - मुख्यमंत्री
कऱ्हाड (जि. सातारा) : ‘गेल्या साडेचार वर्षांत आपल्या आयुष्यातील प्रत्येक क्षण कष्टकरी, शेतकरी व सर्वसामान्यांच्या हितासाठी खर्च केला. त्याची पोचपावती लोकसभा निवडणुकीत मिळाली, तशीच विधानसभा निवडणुकीतही मिळेल,’ असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला.
रेठरे बुद्रुक येथे जयवंतराव भोसले कृष्णा कृषी महाविद्यालय प्रांगणात उभारलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या अश्वारूढ पुतळ्याचे अनावरण मुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते गुरुवारी झाले. त्यानंतर झालेल्या शेतकरी मेळाव्यात ते बोलत होते. अध्यक्षस्थानी महसूलमंत्री चंद्रकांत पाटील होते. फडणवीस म्हणाले, ‘आर्टीफिशल इंटलिजन्सी, डिजिटलायझेशन यासारख्या प्रगत तंत्रज्ञानाचा अवलंब करून शेतमाल उत्पादन वाढ व उत्पादन खर्च कमी करण्याचे शासनाचे धोरण आहे. याबाबतचा प्रयोग राज्यातील सहा जिल्ह्यांत सुरू आहे. दरम्यान, कागल (कोल्हापूर) येथे बोलताना स्वत:ला ‘पर्मनंट आमदार’ समजणाऱ्यांना या निवडणुकीत जनता नक्की घरी बसवेल, असा टोला मुख्यमंत्र्यांनी हसन मुश्रीफ यांना लगावला.
शाहू साखर कारखान्याचे संस्थापक स्वर्गीय विक्रमसिंह घाटगे यांच्या अर्ध पुतळा अनावरण समारंभानंतर झालेल्या शेतकरी मेळाव्यात ते बोलत होते. कागलच्या जनतेचे प्रेमच समरजित घाटगे यांना लोकशाहीच्या मंदिरात पोहोचवेल, असा विश्वास व्यक्त करून मुख्यमंत्र्यांनी त्यांच्या विधानसभेच्या उमेदवारीचेही स्पष्ट संकेत दिले.