साताऱ्यातील राजेंच्या सत्ताकेंद्राला हादरा देण्याचे संकेत!, शरद पवार गटाकडून हालचाली सुरू
By सचिन काकडे | Updated: May 8, 2025 15:32 IST2025-05-08T15:32:28+5:302025-05-08T15:32:54+5:30
शरद पवार आज साताऱ्यात

साताऱ्यातील राजेंच्या सत्ताकेंद्राला हादरा देण्याचे संकेत!, शरद पवार गटाकडून हालचाली सुरू
सचिन काकडे
सातारा : स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचा मार्ग मोकळा झाल्याने आता जिल्ह्यातील सर्वच पालिकांमध्ये घमासान पाहायला मिळणार आहे; परंतु सर्वाधिक चुरशीचा सामना सातारा पालिकेत रंगणार आहे. दोन राजे एकत्र आल्याने साहजिकच त्यांची ताकद प्रचंड वाढली आहे; परंतु राजेंच्या सत्ताकेंद्राला हादरा देण्यासाठी यंदा पूर्ण ताकतीने निवडणूक रिंगणात उतरणार असल्याचे संकेत राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाने दिले आहेत.
सातारा पालिकेत खासदार उदयनराजे भोसले व मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्या मनोमिलनाची सत्ता होती. २०१६ रोजी झालेल्या निवडणुकीत हे मनोमिलन तुटले अन् दोघांनीही स्वतंत्र निवडणूक लढवली. या निवडणुकीत खासदार उदयनराजे यांच्या सातारा विकास आघाडीने मंत्री शिवेंद्रसिंहराजे यांच्या नगर विकास आघाडीला शह देत नगराध्यक्ष पदासह एकूण २२ नगरसेवक निवडून आणत पालिकेवर वर्चस्व प्रस्थापित केले. पुढील सहा-सात वर्षांच्या कालावधीत बऱ्याच राजकीय घडामोडी घडल्या. दोन्ही राजे राष्ट्रवादी सोडून भाजपवासी झाले. अंतर्गत हेवेदावे, द्वंद्व विसरून त्यांचे मनोमिलन घडून आले अन् दुभंगलेले कार्यकर्तेही एक झाले.
सातारा पालिकेत सध्या दोन्ही आघाड्या कार्यरत असल्या, तरी यंदाची निवडणूक आघाड्यांमार्फत लढायची की पक्षचिन्हावर? याबाबत अद्याप कोणताही निर्णय झालेला नाही. तरीदेखील राजे व त्यांच्या शिलेदारांकडून निवडणुकीची जोरकस तयारी केली जाणार आहे. सातारा शहरात दोन्ही राजेंना मानणारा वर्ग मोठा आहे. तीन वर्षे निवडणूक झाली नसली तरी या कालावधीत त्यांनी पक्षबांधणी सक्षमपणे केली. नव्या कार्यकर्त्यांची फळी उभी केली. या कालावधीत राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस व उद्धवसेना हे पक्ष थोडे बॅकफूटवर गेले. परंतु, महाआघाडीने यंदा सक्षमपणे निवडणूक लढण्याचे संकेत दिल्याने सातारा पालिकेतील राजकीय समीकरणे भलतीच ढवळून निघणार आहेत.
कशी असणार व्यूव्हरचना?
सातारा जिल्हा हा एकेकाळी राष्ट्रवादी काँग्रेसचा बालेकिल्ला राहिला आहे. राष्ट्रवादी पक्षात दुफळी पडली असली, तरीदेखील शरद पवार यांना मानणारा मोठा वर्ग आजही येथे आहे. उद्धवसेना व काँग्रेसनेदेखील पक्षाला अधिक बळकटी दिली नसली तरी आपले अस्तित्व कायम ठेवले आहे. त्यामुळे राजेंच्या सत्ताकेंद्राला हादरा देण्यासाठी महाआघाडी नेमकी काय व्यूहरचना आखणार? हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.
शरद पवार आज साताऱ्यात
कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या पुण्यतिथी कार्यक्रमानिमित्त गुरुवारी (दि. ८) राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार साताऱ्यात येत आहेत. त्यामुळे त्यांच्याशी आगामी पालिका निवडणुकीबाबत खलबते होऊ शकतात.
आम्हाला नवीन पर्याय हवा आहे, अशी सातारकरांची मागणी आहे. त्यामुळे सातारा पालिकेसाठी राष्ट्रवादी, काँग्रेस व उद्धवसेना या तीन पक्षांचे पॅनल निश्चितच असणार आहे. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्याशी याबाबत पूर्वीही चर्चा झाली असून, आम्ही ही निवडणूक पूर्ण ताकदीने लढवू. - दीपक पवार, माजी जिल्हा परिषद सदस्य