ऑनलाइन फसवणुकीचे तब्बल एक कोटी बँकेत पडून !, न्यायालयाच्या आदेशाकडेही दुर्लक्ष

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 10, 2025 16:46 IST2025-01-10T16:46:18+5:302025-01-10T16:46:55+5:30

तक्रारदारांना मिळाले ६० लाख परत

As much as 1 crore rupees lying in the bank due to online fraud in Satara district | ऑनलाइन फसवणुकीचे तब्बल एक कोटी बँकेत पडून !, न्यायालयाच्या आदेशाकडेही दुर्लक्ष

ऑनलाइन फसवणुकीचे तब्बल एक कोटी बँकेत पडून !, न्यायालयाच्या आदेशाकडेही दुर्लक्ष

सातारा : ऑनलाइन फसवणूक झाल्यानंतर काही क्षणात हे पैसे सायबर चोरट्यांच्या घशात जाऊ नयेत म्हणून सायबर पोलिस तातडीने बँकेशी संपर्क साधून पैसे होल्ड करतात. त्यामुळे अनेक तक्रारदारांना मोठा दिलासा मिळतो. पण काही बँकांच्या ढिसाळ कारभारामुळे तक्रारदारांना वेळेत पैसे परत मिळत नाहीत. सातारा जिल्ह्यात अशाचप्रकारे ऑनलाइन फसवणुकीचे तब्बल १ कोटी रुपये बँकेत पडून आहेत. हे पैसे तक्रारदारांना परत करावेत, असा न्यायालयानेही आदेश दिला आहे. मात्र, अद्यापही अनेक तक्रारदारांचे पैसे परत मिळाले नसल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे.

जिल्ह्यात गेल्या वर्षभरात ऑनलाइन फसवणुकीच्या घटना वाढल्या असून, सायबर चोरट्यांकडून अनेकांची फसवणूक केली जात आहे. सातारा जिल्ह्यात गेल्या वर्षभरात २ हजार ९७० जणांची ऑनलाइन फसवणूक झाली आहे. त्यातून तब्बल ३ कोटी ४७ लाख २७ हजारांची रक्कम सायबर चोरट्यांनी हातोहात गायब केली. मात्र, सायबर पोलिसांनी तातडीने हालचाली करून १ कोटी ६० रुपये होल्ड केले. त्यातील ६० लाख रुपये सायबर पोलिसांनी तक्रारदारांना परत मिळवूनसुद्धा दिले.

परंतु १ कोटी रुपयांची रक्कम अद्याप तक्रारदारांना परत मिळाली नाही. फसवणुकीचा गुन्हा दाखल झाल्यानंतर ही रक्कम परत मिळण्यासाठी न्यायालयीन प्रक्रिया करावी लागते. संबंधित तक्रारदारांचे पैसे तातडीने द्यावेत, असा न्यायालयाने आदेशही संबंधित बँकांना दिला असल्याचे सायबर पोलिस ठाण्यातून सांगण्यात आले. मात्र, बँका चालढकल करत असल्याने आमचाही नाइलाज असल्याचे सायबर पोलिसांचे म्हणणे आहे.

सुरुवातीला सहकार्य..नंतर दुर्लक्ष

ऑनलाइन फसवणुकीतून गेलेले पैसे आपल्याला परत मिळतील की नाही, याची शाश्वती नसते. मात्र, सायबर चोरट्यांच्या घशात गेलेले पैसे सायबर पोलिसांनी होल्ड करून ठेवले. यामध्ये बँकांनीही सुरुवातीला चांगले सहकार्य केले. परंतु लोकांचे पैसे परत देताना सहकार्य का केले जात नाही, हे कोडेच आहे. असे सायबर पोलिस म्हणताहेत.

Web Title: As much as 1 crore rupees lying in the bank due to online fraud in Satara district

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.