यांत्रिकीकरणाचा ‘जीवा-शिवा’च्या जोडीला फटका !, बैलांच्या संख्येत घट
By नितीन काळेल | Updated: July 9, 2025 14:23 IST2025-07-09T14:21:21+5:302025-07-09T14:23:01+5:30
छोटी यंत्रे आली; बैलांचा वर्षभर सांभाळा नको !

यांत्रिकीकरणाचा ‘जीवा-शिवा’च्या जोडीला फटका !, बैलांच्या संख्येत घट
नितीन काळेल
सातारा : गावांचेही शहरीकरण आणि शेतात यांत्रिकीकरणाला सुरूवात झाल्याने बळीराजाच्या ‘जीवा-शिवा’ची संख्या झपाट्याने कमी होऊ लागली आहे. मागील २० व्या पशुगणेत जिल्ह्यात सुमारे ४० हजारांवर बैल नोंद झाले होते. पण, आताच्या २१ व्या गणनेत २४ हजारांवर नोंद झाल्याचे समोर येत आहे. यामुळे बळीराजाही बैलांपासून दूर जात असल्याचे स्पष्ट होत आहे.
शेती कसण्यासाठी पूर्वांपार बैलाचा वापर करण्यात येत असे. २५ वर्षांपूर्वीपर्यंततरी अधिक करुन बैल हेच शेतीच्या कामासाठीचे मुख्य साधन होते. पण, जागतिकीकरणाच्या लाटेत सर्वच क्षेत्रात अमुलाग्र बदल झाला आहे. गावांत सर्व सुख, सुविधा, यंत्रे पोहोचलीत. त्यामुळे गावेही कात टाकत असून शहरीकरण वाढत चालले आहे. त्यामुळे शेतीतही क्रांतिकारक बदल होत आहेत. शेतकरी यांत्रिकीकरणाला प्राधान्य देत आहे. त्यामुळे शेती कसण्यासाठी बैलांचा वापर कमी झाला आहे. तसेच शेतकरी यंत्रे खरेदी करुन वापर करत आहेत. याचा परिणाम असा झाला आहे की बैलांची संख्या झपाट्याने कमी झाली आहे.
सातारा जिल्ह्यात पाच वर्षांपूर्वी २० वी पशुगणना झाली. त्यावेळी ४० हजार ६६९ बैलांची नोंद झालेली. पण, नुकत्याच झालेल्या २१ व्या पशुगणनेत जिल्ह्यात फक्त २४ हजार २१७ बैलांची नोंद आहे. म्हणजे काही वर्षांतच बैलांच्या संख्येत जवळपास ४० टक्के घट झाल्याचे स्पष्ट होत आहे. आताच्या पशुगणनेची आकडेवारी अजून जाहीर नसलीतरी नोंदीचा आकडा समोर आलेला आहे.
छोटी यंत्रे आली; बैलांचा वर्षभर सांभाळा नको !
शेतीसाठी छोटी यंत्रे आली आहेत. ट्रॅक्टरही छोटा मिळत आहे. यामुळे शेतकरी ही यंत्रे सहजच खरेदी करतो. तर दुसरीकडे बैलांचा वर्षभर सांभाळ करायचा. त्यांना खाऊ घालायचे. त्यासाठी चारा आणि मनुष्यबळ लागते. त्यापेक्षा यंत्रे फायद्याची हे गणित ओळखून शेतकऱ्यांचा बैलाकडे ओढा कमी झाल्याचे वास्तव आहे.
जिल्ह्यातील पशुधन ११ लाखांवर..
जिल्ह्यात २० व्या पशुगणनेनुसार १२ लाख ८ हजार ८७५ पशुधनाची नोंद झाली होती. तर आताच्या २१ व्या गणनेत ११ लाख १३ हजार ६०४ जनावरांची नोंद झालेली आहे. केंद्र शासन अधिकृतरित्या ही आकडेवारी जाहीर करणार आहे. पण, मिळालेल्या माहितीनुसार जिल्ह्यातील पशुधनात ७ ते ८ टक्के घट झाली आहे. तसेच गायवर्गीय पशुधनाची संख्या वाढली आहे. म्हैसवर्गीय जनावरांची संख्या कमी झाली आहे. गायवर्गीय ३ लाख ५६ हजार ४८३ तर म्हैसवर्गीय संख्या २ लाख ५२ हजार १३० आहे.