कुडाळ : कोरोनामुळे गावोगावच्या यात्रा, जत्रा, उत्सव यावर मार्चपासून निर्बंध घालण्यात आले आहेत. यामुळे या काळात यात्रेनिमित्त होणारा तमाशाचा फड अडचणीत सापडला आहे. या फडामध्ये कला सादर करणाऱ्या लोकलकलावंतांची कलाही कार्यक्रमाअभावी अडचणीत आली आहे. यामुळे त्यांना आर्थिक विवंचनेत सापडले आहेत. रोजगाराअभवी त्यांच्यावर उपासमारीची वेळ आली आहे.
महाराष्ट्राच्या लोककलांचे खरे वैभव असणारा तमाशा हा लोककलेचा प्रकार अठराव्या शतकात सुरू झाला. तमाशा एकोणिसाव्या शतकापासून ते विसाव्या शतकाच्या मध्यकालापर्यंत बहरत गेला. शाहीर पठ्ठे बापूराव यांचा काळ म्हणजे या कलेचा सुवर्णकाळ ठरला. यात्रा, जत्रांमधून मनोरंजन करीत सामाजिक प्रबोधन साधण्याचा प्रयत्न यांच्याकडून होत होता. मात्र कोरोनामुळे पोटाची भूक भागवण्यासाठी आपली कला सादर करणारा लोककलावंत आर्थिक विवंचनेत अडकला आहे.
मार्च महिन्यात ऐन हंगामात कोरोनाच्या उद्रेकामुळे सर्वच ठप्प झाले. यात्रांचा हंगाम असल्याने याचा मोठा फटका तमाशा कलावंताला बसला. फडमालकांच्या घेतलेल्या कामाच्या सुपाऱ्याही रद्द झाल्या. गत वर्षाची परिस्थिती आजही काहीशी तशीच आहे. अजूनही यात्रा, जत्रा, उत्सव यांना बंदीच घातलेली आहे. यामुळे यावर्षीसुद्धा या तमाशांचे खेळ होणार नाहीत. यातून होणारे अर्थार्जन थांबले.
या परिस्थितीत फडमालक व तमाशा कलावंत मोठ्या आर्थिक अडचणीत सापडले आहेत. आपल्या कलेच्या सादरीकरणातून मिळालेली बिदागीवरच त्यांचा उदरनिर्वाह चालत होता. कोरोनामुळे त्यांचा रोजगरच नाहीसा झाला आहे. यामुळे त्यांची आर्थिक परिस्थिती बिकट झाली आहे.
चौकट:
रोजगारही हिरावला
महाराष्ट्राची लोककला कोरोनाच्या विळख्यात सापडली आहे. लोककलावंतांचा रोजगार नाहीसा झाला आहे. यात्रा, जत्रा उत्सव बंद झाल्याने फडमालक, कलावंत आर्थिक संकटात सापडला आहे. गतवर्षी आणि यंदाही कार्यक्रमास बंदी असल्याने रोजीरोटीचा प्रश्न निर्माण झाला आहे. पिढ्यानपिढ्या कलेचा वारसा जपणाऱ्या या कलावंतांना आज मात्र आर्थिक विवंचनेच्या छायेतच जीवन जगावे लागत आहे.