हिरवा निसर्ग भोवतीने... साताऱ्यांतील सव्वाशे विद्यार्थ्यांची अजिंक्यताऱ्यावर वर्षासहल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 21, 2018 14:32 IST2018-07-21T14:27:02+5:302018-07-21T14:32:56+5:30
साताऱ्यांत सलग पंधरा दिवस धो-धो पाऊस कोसळत आहे. यामुळे अजिंक्यतारा, यवतेश्वर, सज्जनगडाचे डोंगर हिरवागार झाले आहेत. भावी पिढीचे निसर्गाशी नाते जुळावेत, यासाठी साताऱ्यांतील केएसडी शानभाग विद्यालयाने वर्षासहलीचे आयोजन केले होते. यामध्ये विद्यालयातील स्काऊट गाईडचे सुमारे सव्वाशे विद्यार्थी सहभागी झाले होते.

हिरवा निसर्ग भोवतीने... साताऱ्यांतील सव्वाशे विद्यार्थ्यांची अजिंक्यताऱ्यावर वर्षासहल
सातारा : साताऱ्यांत सलग पंधरा दिवस धो-धो पाऊस कोसळत आहे. यामुळे अजिंक्यतारा, यवतेश्वर, सज्जनगडाचे डोंगर हिरवागार झाले आहेत. हिरवा निसर्ग भोवतीने असताना या निसर्गाशी भावी पिढीचे नाते जुळावेत, यासाठी साताऱ्यांतील केएसडी शानभाग विद्यालयाने वर्षासहलीचे आयोजन केले होते. यामध्ये विद्यालयातील स्काऊट गाईडचे सुमारे सव्वाशे विद्यार्थी सहभागी झाले होते.
सातारा जिल्ह्याला निसर्गाकडून भरभरून मिळाले आहे. डोंगराच्या ओघळीतून लहान-मोठे धबधबे वाहू लागले आहेत. महाबळेश्वर, पाचगणी, कासवर वर्षा सहलीसाठी राज्याच्या कानाकोपऱ्यातून पर्यटक येत असतात.
घरातून शाळेपर्यंत विद्यार्थी रिक्षा, बस किंवा पालकांसोबत कारमधून येतात. त्यामुळे पावसात भिजण्याचा त्यांचा फारसा संबंधच येत नाही. गाड्यांच्या काचेतूनच पाऊस बघावा लागतो. घरी आले तर आई-वडील मुलांना पावसात भिजू देत नाहीत. हीच बाब लक्षात घेऊन साताऱ्यातील केएसडी शानभाग विद्यालयाने स्काउट व गाईड उपक्रमाअंतर्गत वर्षासहलीचे आयोजन केले होते.
यामध्ये पाचवीच्या तिन्ही तुकड्यांमधील सव्वाशे विद्यार्थी-विद्यार्थिनी पावसात भिजत सातारा नगरपालिकेपासून अजिंक्यतारा किल्ल्यावर चालत गेले. सहलीत सर्वांनी भरपावसात निसर्ग व प्रवासाचा आनंद आणि आस्वाद घेत पायी चालत सुमारे तीन किलोमीटरचे अंतर हसत खेळत पार केले.