नरेंद्रास्त्रासाठी सेना आग्रही : धनुष्यबाणाच्या चिन्हावर लढणार असतील तर उमेदवारी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 19, 2019 00:05 IST2019-03-18T23:59:19+5:302019-03-19T00:05:35+5:30
सातारा लोकसभा मतदारसंघ आता शिवसेनेकडेच राहणार, हे जवळपास निश्चित झाले आहे. राष्ट्रवादीचे उमेदवार खासदार उदयनराजे भोसले यांच्याविरोधात लढाईसाठी ‘नरेंद्रास्त्र’ आपल्याच भात्यात हवे, यासाठी

नरेंद्रास्त्रासाठी सेना आग्रही : धनुष्यबाणाच्या चिन्हावर लढणार असतील तर उमेदवारी
सागर गुजर।
सातारा : सातारा लोकसभा मतदारसंघ आता शिवसेनेकडेच राहणार, हे जवळपास निश्चित झाले आहे. राष्ट्रवादीचे उमेदवार खासदार उदयनराजे भोसले यांच्याविरोधात लढाईसाठी ‘नरेंद्रास्त्र’ आपल्याच भात्यात हवे, यासाठी शिवसेना आग्रही असून, अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाचे अध्यक्ष नरेंद्र पाटील यांना शिवसेनेत घेण्याची भूमिका पक्षाने घेतली आहे.
खासदार उदयनराजे भोसले यांच्या विरोधात दोनदा लोकसभा निवडणूक लढलेले पुरुषोत्तम जाधव यांना शिवसेनेने पुन्हा एकदा आपल्याकडे घेतले आहे. त्यांच्या हातात शिवबंधन धागा बांधत असताना उद्धव ठाकरे यांनी जाहीरपणे त्यांना कोणताही शब्द दिला नसला तरी आगामी निवडणुकीत भगवा फडकावण्याचा शब्द मात्र जाधवांकडून घेतला आहे.
सातारा लोकसभा मतदारसंघ आपल्याला सोडावा, असा आग्रह भाजपने शिवसेनेकडे धरला होता. मात्र, शिवसेना हा मतदारसंघ सोडायला तयार नाही. भाजपने जिल्ह्यातील बहुतांश नगरपालिका व नगरपंचायतींमध्ये प्रस्थापित राष्ट्रवादी व काँगे्रसला धक्के दिले आहेत. भाजपने या निवडणुकांमध्ये साडेतीन लाखांच्यावर मतदान घेतल्याचा दावा भाजपच्या स्थानिक नेत्यांनी केला आहे. सातारा लोकसभा मतदारसंघ भाजपला मिळविण्यासाठी वरिष्ठ पातळीवर प्रयत्न केले; परंतु शिवसेना सातारा लोकसभा मतदारसंघ सोडायला तयार नाही.
पुरुषोत्तम जाधव यांना शिवसेनेने पुन्हा एकदा आपल्याकडे घेतले असले तरी नरेंद्र पाटील हे त्यांच्यापेक्षा जोरदार टक्कर देऊ शकतात, असे शिवसेनेच्या नेत्यांना वाटते. नरेंद्र पाटील यांच्यासाठी भाजपने सातारा मतदारसंघ मागितला होता. शिवसेननेही नरेंद्र पाटील यांच्या उमेदवारीबाबत हिरवा कंदील दाखवला. मात्र त्यांनी शिवसेनेत प्रवेश करून सातारा लोकसभेची लढाई करावी, अशी अट घातली आहे. तशी चर्चाही दोन्ही पक्षांमध्ये सुरू झाली आहे; पाटील यांच्यासह भाजपमधील आणखी दोघांना शिवसेनेत प्रवेश देऊन त्यांना इतर दोन मतदार संघात उमेदवारी देण्याची मागणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी लावून धरली होती. मात्र, त्याला शिवसेनेने नकार दर्शविला. केवळ साताऱ्याच्या जागेसाठी चर्चा करून निर्णय होऊ शकतो, इतर ठिकाणी नाही, असे शिवसेनेने स्पष्ट केले आहे. नरेंद्र पाटील यांना भाजपने मोठे पद दिले असल्याने त्यांना निवडणूक लढण्याची इच्छा असूनही भाजप सोडता येत नाही. या परिस्थितीत पुरुषोत्तम जाधव यांचीच उमेदवारी निश्चित होण्याची शक्यता आहे. त्याआधी सातारा लोकसभा मतदारसंघाच्या युतीच्या उमेदवारीचा निर्णय होणार आहे.
भाजपची ताकद शिवसेनेच्या पथ्यावर
भाजप-शिवसेनेची युती असल्याने युतीच्या धोरणानुसार भाजपला शिवसेना उमेदवाराचे काम करावे लागणार आहे. भाजपने वाढविलेली ताकद शिवसेना उमेदवाराच्याच पथ्यावर पडणार आहे.