वीज वितरणाची मनमानी, ग्रामपंचायतीची मानहानी; पथदिव्यांसाठी खंडाळा तालुक्याला वेगळा न्याय का?
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 8, 2022 17:00 IST2022-04-08T16:59:08+5:302022-04-08T17:00:34+5:30
खंडाळा तालुक्यातील विविध गावांच्या हद्दीतील पथदिव्यांचा वीज पुरवठा बंद असल्यामुळे ग्रामस्थांना अनेक अडचणींना सामोरे जावे लागत आहे.

वीज वितरणाची मनमानी, ग्रामपंचायतीची मानहानी; पथदिव्यांसाठी खंडाळा तालुक्याला वेगळा न्याय का?
खंडाळा : खंडाळा तालुक्यातील विविध गावांच्या हद्दीतील पथदिव्यांचा वीज पुरवठा बंद असल्यामुळे ग्रामस्थांना अनेक अडचणींना सामोरे जावे लागत आहे. जिल्ह्यातील इतर तालुक्यांत सर्व गावांचा वीज पुरवठा सुरू असताना खंडाळा तालुक्याला वेगळा न्याय देऊन पिळवणूक केली जात असल्याने तालुका सरपंच परिषदेच्या वतीने वीज वितरण कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला.
सरपंच परिषदेचे अध्यक्ष गणेश पवार, उपाध्यक्ष हिरालाल घाडगे, प्रदीप होळकर यांच्या नेतृत्वाखाली नागरिकांच्या न्याय्य हक्कासाठी पंचायत समिती ते वीज वितरण कार्यालय असा मोर्चा काढून ठिय्या आंदोलन करण्यात आले. यावेळी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, तालुक्यातील विविध गावांच्या हद्दीतील पथदिव्यांचा वीज पुरवठा बंद असल्यामुळे ग्रामस्थांना अनेक अडचणींना सामोरे जावे लागत आहे. रात्रीच्या वेळी महिलांना बाहेर पडणे तसेच शेतकरी वर्गाला शेतावर जाण्यासाठी अंधारातून मार्ग काढावा लागत आहे. त्यामुळे अनेक अडचणी निर्माण होत आहेत.
वास्तविक सातारा जिल्ह्यातील इतर तालुक्यात सर्व गावांचा वीज पुरवठा सुरळीतपणे चालू आहे. याबाबतची माहिती प्रत्यक्ष जाऊन आम्ही घेतली आहे. मात्र, खंडाळा तालुक्यातच वीज वितरणच्या अधिकाऱ्यांचा मनमानी कारभाराचा फटका ग्रामस्थांना सहन करावा लागत आहे. तालुक्यातील काही गावांनी थकीत वीज बिले भरल्याने त्यांचा वीज पुरवठा सुरू आहे.
मात्र, बहुतांश गावातील ग्रामपंचायतीचे कर उत्पन्न कमी असल्याने वीज बिले भरणे शक्य झालेले नाही, तरी इतर तालुक्यात अशा पद्धतीने वीज पुरवठा सुरू असताना खंडाळा तालुक्याला वेगळा न्याय का? असा जाब विचारण्यासाठी खंडाळा तालुक्यातील सरपंच परिषदेच्या माध्यमातून विविध गावांचे सरपंच उपसरपंच ग्रामपंचायतीचे सदस्य यांनी लोकांच्या नागरी हक्कांसाठी वीज वितरण कार्यालयावर भव्य मोर्चा काढला. यावेळी वीज वितरण अधिकाऱ्यांना निवेदन देऊन सर्व गावांचा पथदिव्यांचा वीजपुरवठा तातडीने सुरू करण्याची विनंती करण्यात आली.
जिल्ह्यातील इतर तालुक्यात पथदिव्यांची वीज खंडित केली नाही; मग खंडाळा तालुक्यात वेगळा नियम आहे का? अधिकाऱ्यांनी मनमानी कारभार करून लोकांना वेठीस धरले आहे. वारंवार सूचना करूनही परिस्थिती बदलली नसल्याने गावातील समस्यांना वाचा फोडण्यासाठी मोर्चाचा मार्ग पत्करावा लागला. -हिरालाल घाडगे, उपाध्यक्ष सरपंच परिषद