Satara: सावित्रीमाई फुले स्मारक अन् प्रशिक्षण केंद्र बांधकामास ११० कोटींची मान्यता
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 10, 2025 18:10 IST2025-12-10T18:10:01+5:302025-12-10T18:10:17+5:30
नायगावात उभारणार : शासनाकडून प्रशासकीय मान्यता मिळाल्याने काम मार्गी लागणार

संग्रहित छाया
सातारा : खंडाळा तालुक्यातील नायगाव येथे ज्ञानज्योती सावित्रीमाई फुले यांचे स्मारक आणि महिला प्रशिक्षण केंद्र बांधकामास राज्य शासनाच्या ग्रामविकास विभागाने प्रशासकीय मान्यता दिली आहे. एकूण ११० काेटी ५६ लाखांची तरतूद आहे. यामुळे स्मारक तसेच प्रशिक्षण केंद्राचे काम मार्गी लागणार आहे.
जिल्हाधिकारी संतोष पाटील यांनी नायगाव येथील ज्ञानज्योती सावित्रीमाई फुले यांचे स्मारक व महिला प्रशिक्षण केंद्र उभारण्याबाबत १४२ कोटी ६० लाख रुपयांचे अंदाजपत्रक शासनास सादर केले होते. यासाठी २२ एप्रिलच्या मंत्रिमंडळ बैठकीत स्मारक आणि महिला प्रशिक्षण केंद्र उभारण्यासाठी ग्रामविकास विभागांतर्गत मान्यता देण्यात आली.
त्याचबरोबर बांधकाम आराखड्यासाठी (भूसंपादनाच्या खर्चासह) एकूण अनवर्ती खर्च म्हणून १४२ कोटी ६० लाख व महिला प्रशिक्षण केंद्र दीर्घ कालावधीसाठी कार्यान्वित करण्यास अंदाजे ६७ लाख १७ हजार असा एकूण १४३ कोटी २७ लाख इतका अतिरिक्त नियतव्यय व तरतूद उपलब्ध करुन देण्यास मान्यता देण्यात आली होती.
जिल्हाधिकाऱ्यांनी सादर केलेले १४२ कोटी ६० लाखांचे अंदाजपत्रक आणि आराखडा सार्वजनिक बांधकाम विभागाकडे तांत्रिक छाननीसाठी सादर करण्यात आला. त्यानंतर २८ ऑक्टोबर रोजी बांधकाम विभागामार्फत हा आराखडा मुख्य सचिवांच्या अध्यक्षतेखालील उच्चस्तरीय सचिव समितीच्या विचारासाठी ठेवण्यात आला. या समितीने अंदाजपत्रकातील भूसंपादनाचा खर्च वगळता अंदाजे ११० कोटी ५६ लाख रकमेस सहमती दर्शविली आहे. या अनुषंगाने या आराखड्यास प्रशासकीय मान्यता देण्यात आलेली आहे.
आराखड्यात या प्रमुख कामांचा समावेश...
- प्रवेशद्वार चाैक, मुख्य स्मारक इमारत, कलादालन १ व २, सभागृह, स्मारक कार्यालय, उपाहारगृह, स्मरणिका, प्रशिक्षण केंद्र, निवासी क्षेत्र, विश्रामगृह, पर्यटन महामंडळाच्या इमारतीचे फेस लिफ्टिंग, अग्निशमन व्यवस्था, वातुनुकूलित यंत्रणा, पाणीपुरवठा व स्वच्छता, संरक्षण भिंत, अंतर्गत रस्ते, भित्तिचित्रे, पुतळा चबुतरा अन् सावित्रीमाई फुले यांचा कांस्य पुतळा (५१ फूट उंच)
नायगाव येथे ज्ञानज्योती सावित्रीमाई फुले यांचे स्मारक तसेच महिला प्रशिक्षण केंद्र होणार आहे. यासाठी राज्य शासनाने ११० कोटी ५६ लाख रुपयांच्या अंदाजपत्रकास प्रशासकीय मान्यता दिली आहे. सातारा जिल्हा परिषद स्मारकाचे काम लवकरात लवकर होण्यासाठी प्रयत्नशील आहे. या स्मारकात विविध सुविधा असणार आहेत. प्रशिक्षणासाठी येणाऱ्या महिलांसाठी निवासी व्यवस्था असेल. सावित्रीमाई फुले यांची जीवनगाथा आणि कार्य प्रेरणादायी आहे. या स्मारकामुळे त्यांचे कार्य नवीन पिढीलाही समजण्यास मदत होईल. - याशनी नागराजन, मुख्य कार्यकारी अधिकारी