फलटण : कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी ग्रामपंचायतींना १५व्या वित्त आयोग निधीतून ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर मशीन खरेदीस मान्यता देण्याची मागणी खा. रणजितसिंह नाईक-निंबाळकर यांनी केली होती. सातारा जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी जिल्ह्यातील सर्व गटविकास अधिकाऱ्यांना याबाबतचे निर्देश दिले असल्याची माहिती भाजप जिल्हा उपाध्यक्ष जयकुमार शिंदे यांनी पत्रकाद्वारे दिली.
सातारा जिल्ह्यामध्ये कोरोना रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. शहरी भागाबरोबरच ग्रामीण भागातही मोठ्या प्रमाणात रुग्ण संख्या वाढत असल्याने प्रत्येक ग्रामपंचायतीमध्ये आयसोलेशन सेंटर उभी केली जात आहेत. या सेंटरमधील रुग्णांसाठी १५व्या वित्त आयोग निधीतून ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर मशीन खरेदी करण्याचे आदेश द्यावेत, अशी सूचना खा. रणजितसिंह नाईक - निंबाळकर यांनी केली होती. त्यास सातारा जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी विनय गौडा यांनी सहमती दर्शवीत तसे आदेश जिल्ह्यातील गटविकास अधिकारी यांना दिले.
जिल्हास्तरावरुन १५व्या वित्त आयोग निधी वापराबाबत विलंब होऊ शकतो. त्यासाठी याबाबत सर्वाधिकार गटविकास अधिकारी यांना देऊन तातडीने निर्णय घ्यावेत व तशा पद्धतीचे प्रस्ताव ग्रामपंचायतीकडून मागून घेऊन त्यास परवानगी द्यावी, असे मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी या आदेशात स्पष्ट केले आहे. या मशीन गव्हर्मेंट ई मार्केट प्लस या साइटवरून खरेदी करता येणार आहेत.
आपल्या पत्राची जिल्हा परिषदेने तातडीने दखल घेतल्याबद्दल व कार्यवाही केल्याबद्दल खा. रणजितसिंह नाईक - निंबाळकर यांनी जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी यांचे आभार व्यक्त केले.