लाचप्रकरणी सातारा जिल्हा व सत्र न्यायाधीश यांचा अटकपूर्व जामिनासाठी अर्ज
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 13, 2024 11:44 IST2024-12-13T11:43:17+5:302024-12-13T11:44:04+5:30
आज सुनावणी : सरकार पक्षाचे म्हणणे ऐकून घेणार

लाचप्रकरणी सातारा जिल्हा व सत्र न्यायाधीश यांचा अटकपूर्व जामिनासाठी अर्ज
सातारा : जामीन अर्जाबाबत मदत आणि मंजूर करून देण्यासाठी पाच लाखांची लाच मिळविण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी जिल्हा व सत्र न्यायाधीश वर्ग तीन धनंजय निकम यांच्यासह इतर तिघांविरोधात गुन्हा नोंद करण्यात आला आहे, तर याप्रकरणी न्यायाधीश निकम यांच्यावतीने जिल्हा न्यायालयात अटकपूर्व जामिनासाठी अर्ज करण्यात आला आहे. यावर सरकार पक्षाचे म्हणणे ऐकण्यासाठी शुक्रवारी सुनावणी होणार असल्याची माहिती देण्यात आली आहे.
पुणे येथील लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडील माहिती आणि पोलिसांत गुन्हा नोंद झाल्यानुसार याप्रकरणात पुणे येथील एका महिलेने तक्रार दिलेली आहे. त्यानुसार आनंद मोहन खरात (रा. खरातवस्ती, दहिवडी, ता. माण), किशोर संभाजी खरात (रा. वरळी, मुंबई), जिल्हा व सत्र न्यायाधीश क्र. तीन धनंजय लक्ष्मणराव निकम आणि अनोळखी एकाच्या विरोधात गुन्हा नोंद झालेला आहे.
तक्रारदार महिलेच्या वडिलांना सातारा शहर पोलिस ठाण्यातील गुन्ह्यात अटक झालेली आहे. त्यांनी जिल्हा न्यायालयात जामिनासाठी अर्ज दाखल केलेला आहे. यासाठी संशयित एक आणि दोन यांनी जिल्हा व सत्र न्यायाधीश निकम यांच्यांशी संगनमत केले, तसेच जामीन अर्जाबाबत मदत करणे, जामीन मंजूर करून देण्यासाठी न्यायाधीश निकम यांच्यासाठी पाच लाख रुपयांची मागणी केली. तसेच लाचेची रक्कम मिळविण्याचा प्रयत्न केल्याचेही निष्पन्न झाले. त्यामुळे पोलिसांत तक्रार देण्यात आली होती.
याप्रकरणात गुन्हा नोंद झाल्यानंतर न्यायाधीश धनंजय निकम यांच्या वतीने ॲड. ताहीर मणेर यांनी जिल्हा न्यायालयात अटकपूर्व जामिनासाठी अर्ज केला आहे, तर सरकारी वकील आणि लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे म्हणणे ऐकून घेण्यासाठी जामीन अर्जावर शुक्रवारी पुढील सुनावणी ठेवली आहे, अशी माहिती ॲड. ताहीर मणेर यांनी ‘लोकमत’शी बोलताना दिली.
अटक कोणालाही नाही..
याप्रकरणात चाैघांच्या विरोधात गुन्हा दाखल झालेला आहे. पण, आतापर्यंत कोणालाही ताब्यात घेतलेले नाही, तसेच अटकही झालेली नाही, अशी माहिती लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या अधिकाऱ्यांनी दिली, तर या गुन्ह्याबाबत पुणे येथील ‘लाचलुचपत’चे पथक संपूर्ण लक्ष ठेवून आहे.