पुसेगावच्या श्री सेवागिरी यात्रेचा आज ‘मानाच्या झेंडा’ मिरवणुकीने होणार प्रारंभ, रविवारी रथोत्सव सोहळा
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 25, 2024 13:59 IST2024-12-25T13:59:45+5:302024-12-25T13:59:59+5:30
पुसेगाव : लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या येथील श्री सेवागिरी महाराजांचा यंदाचा वार्षिक रथोत्सव सोहळा रविवारी (दि. २९) साजरा होणार ...

पुसेगावच्या श्री सेवागिरी यात्रेचा आज ‘मानाच्या झेंडा’ मिरवणुकीने होणार प्रारंभ, रविवारी रथोत्सव सोहळा
पुसेगाव : लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या येथील श्री सेवागिरी महाराजांचा यंदाचा वार्षिक रथोत्सव सोहळा रविवारी (दि. २९) साजरा होणार आहे. सलग अकरा दिवस चालणाऱ्या या यात्रेचा बुधवारी (दि. २५) सकाळी ९ वाजता ‘मानाच्या झेंडा’ मिरवणुकीने प्रारंभ होणार आहे.
श्री सेवागिरी महाराजांच्या ७७व्या पुण्यस्मरणानिमित्त सेवागिरी यात्रा दि. २२ डिसेंबर ते दि. ४ जानेवारीदरम्यान पुसेगाव येथे वार्षिक यात्रा प्रदर्शन भरवण्यात येणार असल्याची माहिती मठाधिपती सुंदरगिरी महाराज व देवस्थान ट्रस्टचे चेअरमन डॉ. सुरेश जाधव, माजी चेअरमन रणधीर जाधव व बाळासाहेब जाधव, संतोष वाघ, सचिन देशमुख व गौरव जाधव यांनी दिली.
यात्रेनिमित्त ११ दिवसांच्या कालावधीत विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. मानाच्या झेंडा मिरवणुकीने यात्रेस प्रारंभ होत असून, बुधवार, दि. २५ व २६ रोजी श्री हनुमानगिरी हायस्कूलच्या मैदानावर अखिल भारतीय दिवसरात्र खुल्या शूटिंग व्हॉलिबॉल स्पर्धा होणार आहेत. शुक्रवारी (दि. २७) बैलगाडी शर्यती, तर शनिवारी (दि. २८) कै. नारायणगिरी महाराज यांच्या पुण्यतिथीनिमित्त निकाली कुस्त्यांचे जंगी मैदान आयोजित केले आहे.
रविवारी (दि. २९) हा यात्रेचा मुख्य दिवस असून, या दिवशी सद्गुरु श्री सेवागिरी महाराजांच्या पादुका व प्रतिमेची फुलांनी व नोटांच्या माळांनी सजवलेल्या रथातून सवाद्य मिरवणूक काढण्यात येणार आहे. दरम्यान, दि. २८ ते १ जानेवारी या कालावधीत ‘राज्यस्तरीय सेवागिरी कृषी प्रदर्शन’ भरवण्यात येणार आहे.
दि. ३१ रोजी जिल्हास्तरीय खुला युवामहोत्सव आणि राज्यस्तरीय कबड्डी स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. दि. २ रोजी श्वान प्रदर्शन आणि श्वान शर्यती होणार आहेत. दि. २ रोजी बक्षीस जनावरांच्या नोंदी, तर दि. ३ रोजी जातिवंत खिलार जनावरांची निवड करण्यात येणार आहे. शनिवार (दि. ४) बक्षीस वितरण समारंभ होणार आहे. पुसेगाव यात्रेकरूंच्या व भाविकांसाठी सर्व सोयीसुविधा ट्रस्ट व ग्रामपंचायतच्या माध्यमातून करण्यात आल्या आहेत, अशी माहिती देवस्थानचे विश्वस्त यांनी दिली.