हिमालयातील अन्नपूर्णा शिखर सर, साताऱ्याची प्रियंका देशात पहिली महिला
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 19, 2021 20:31 IST2021-04-19T20:29:04+5:302021-04-19T20:31:18+5:30
शिखर सर करणारी पहिली भारतीय महिला, इतर १४ मुलींचाही सहभाग

हिमालयातील अन्नपूर्णा शिखर सर, साताऱ्याची प्रियंका देशात पहिली महिला
दीपक शिंदे
सातारा - साताऱ्याची गिर्यारोहक प्रियांका मोहिते हिने हिमालयातील अन्नपूर्णा - १ हे शिखर सर केले आहे. हे शिखर सर करणारी ती पहिली भारतीय महिला ठरली आहे. हे शिखर ८ हजार ९१ मीटर उंचीचे आहे. शुक्रवारी दुपारी प्रियांकानं हे शिखर सर केलं. तिच्यासोबत सहा जणांचा समावेश होता. टीममधील भगवान चवले आणि केवल कक्का यांनीही शिखर सर केलं आहे. जवळपास ६९ जणांनी हे शिखर सर करण्याचा प्रयत्न केला आणि त्यामध्ये त्यांना यश आहे. अन्नपूर्णा - १ हे शिखर उंचीच्या मानानं जगात दहाव्या क्रमांकावर आहे. मात्र, ते सर्वात खडतर शिखर मानलं जातं. गंडकी आणि मार्श्यंगदी या हिमनद्या इथून वाहतात. नासा अर्थ ऑब्झर्व्हेटरीनुसार हिमालयातल्या वेगवान वारा आणि सतत हिमस्खलनाचा धोका यामुळे अन्नपूर्णा रेंजमध्ये कुठल्याही शिखरावर चढाई सोपी नाही. म्हणूनच इथे आजवर अडीचशेच्या आसपास गिर्यारोहकांनाच यशस्वी चढाई करता आली आहे.
महाराष्ट्रातल्या गिर्यारोहकांचं हे यश आणखी विशेष ठरतं, कारण कोव्हिडच्या साथीच्या काळात ही मोहीम त्यांनी पार पाडली आहे. लॉकडाऊनची अनिश्चितता, तयारीसाठी मिळालेला मर्यादित वेळ, कोरोना विषाणूची भीती, अशा अनेक अडचणींवर मात करत त्यांनी हे यश मिळवलं आहे. प्रियांकानं याआधी २०१३ मध्ये माऊंट एव्हरेस्ट, २०१८ मध्ये ल्होत्से, २०१९ मध्ये माऊंट मकालू अशी शिखरं सर केली आहेत. माऊंट मकालू सर करणारीही ती पहिली भारतीय महिला ठरली होती. प्रियांकाने वयाच्या तेराव्या वर्षापासूनच ट्रेकिंगचा प्रवास सुरु केला. तिने हिमालयातील नीम संस्थेतून गिर्यारोहणासाठी प्रशिक्षण घेण्याचे ठरविले पण वय कमी असल्यामुळे तिला ते तेव्हा घेता आले नाही. त्यानंतर बारावीनंतर तिने हे प्रशिक्षण पूर्ण केले.
भगवान चवले - गिर्यारोहक
अन्नपूर्णा शिखर सर करण्याचा प्रयत्न करणाऱ्या सहा जणांमध्ये प्रियांका मोहिते ही एकमेव महिला होती. त्याठिकाणच्या अनंत अडचणीचा सामना करत तिने हे शिखर सर केले. महाराष्ट्राच्या गिर्यारोहण क्षेत्रातील ही अभिमानास्पद बाब असून हे यश या क्षेत्रासाठी समर्पित करत आहोत.
प्रियांका मोहिते - महिला गर्यारोहक
अन्नपूर्णा हे खूप अवघड शिखर आहे. मी सुरुवातीपासूनच खूप उत्साही होते. आव्हाने आहेत हे माहिती होते. तरीही ते सर करायचं ठरवलं. यश येईल का नाही माहिती नव्हते. पण अखेर यश मिळालेच. शिखर सर केल्यानंतर आनंदाचे अश्रू आले. चढणे आणि उतरणे महत्वाचे होते. शिखर चढताना जी आव्हाने होती, तिच उतरताना देखील होती. पण सर्वांवर मात करुन अखेर शिखर सर केले. आत्तापर्यंत १४ मुलींनी हे शिखर सर केले आहे. त्यात मी पहिली भारतीय आहे.
प्रियांकाच्या नावावर दोन विक्रम
मकालू सर करणारी प्रियांका मोहिते ही पहिली भारतीय महिला ठरली होती. त्यानंतर अन्नपूर्णा १ शिखर सर करणारीही ती पहिला भारतीय महिला ठरली आहे. तिच्यासोबत उत्तराखंडची शितल नावाची एक मुलगी होती. पण, त्याठिकाणच्या परिस्थितीत ती थोडी मागे पडली आणि प्रियांकाने आघाडी घेत अन्नपूर्णा सर करणारी पहिली भारतीय महिला होण्याचा मान मिळविला.