अंगापूर : जिल्ह्यात कोरोनाच्या पहिल्या लाटेपेक्षा दुसऱ्या लाटेने थैमान घातले. या कोरोना लाटेचा संसर्ग वाढत असताना अंगापूर ग्रामपंचायतीने ग्रामस्थांच्या मदतीने वेळेवर विविध उपाययोजना केल्या. त्यामुळे कोरोनाबाधित रुग्णसंख्या रोखण्यात यश आले. सहा महिन्यांत केवळ ३२ रुग्ण आढळले असून त्यातील एकावर उपचार सुरू आहेत.
अंगापूरमध्ये पहिल्या लाटेत अनेक कुटुंबांतील नागरिकांना कोरोनाचा फटका बसल्याने काही कुटुंबे उद्ध्वस्त झाली. तर काही कुटुंबांतील नागरिकांना जीव गमवावा लागला होता. या नुकसानीमुळे कोरोनाच्या दुसऱ्या लाटेची नागरिकांनी धास्ती घेतली होती. आजूबाजूच्या गावातही रुग्णसंख्या झपाट्याने वाढत होती. या पार्श्वभूमीवर ग्रामपंचायतीने तातडीने ग्रामस्तरीय आपत्ती व्यवस्थापन समितीची बैठक घेऊन विविध उपाययोजना राबविण्यास सुरुवात केली. गावात दहा दिवस जनता कर्फ्यू लागू केला. तसेच आठवडा बाजार व भाजी मंडई तत्काळ बंद केली. गावात संचारबंदी जाहीर करून लोकांच्या हालचालींवर निर्बंध आणले.
याचबरोबर सोडियम हायड्रोक्लोराईची संपूर्ण गावात फवारणी करून गाव निर्जंतुकीकरण करण्यात आले. ज्या बाधितांना कमी लक्षणे दिसून आली, त्यांना बाधितांच्या घरी विलगीकरण केले. त्यांना सेवासुविधा पुरविण्यात आल्या. प्राथमिक आरोग्य केंद्रात लसीकरण सुरु झाल्यानंतर होणारी गर्दी लक्षात घेता न्यू इंग्लिश स्कूलमध्ये लसीकरणाची स्वतंत्र सोय करण्यात आली. लसीकरणासाठी टोकन पध्दत सुरू करून लसीकरणात सुसूत्रता निर्माण केली. दरम्यान, सोशल डिस्टिन्स न पाळणाऱ्या, दुकानदार व मास्क न वापरणाऱ्या नागरिकांवर ग्रामपंचायतमार्फत दंडात्मक कारवाई करण्यात आली. गावातच विलगीकरण कक्ष स्थापन करून आरोग्य सेवासुविधा पुरविण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत.
ग्रामपंचायतीने तत्काळ राबविलेल्या या निर्णयामुळे कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत गावात नगण्य रुग्णसंख्या आढळून आली. यादरम्यान आशा स्वयंसेविका व अंगणवाडी सेविका, प्राथमिक आरोग्य उपकेंद्र यांनी घरोघरी जाऊन नागरिकांच्या आरोग्य तपासण्या करण्यात आल्या. यावेळी सर्व ग्रामपंचायत सदस्य, ग्रामस्थांचे सहकार्य लाभले. यापुढील काळातही कोरोना संकट परतवून लावण्यासाठी शासनाच्या नियमांचे काटोकोरपणे पालन करून सहकार्य करण्याचे आवाहन सरपंच वर्षा कणसे, उपसरपंच हणमंत कणसे यांनी केले आहे.
चौकट.
जानेवारीपासून कोरोना स्थिती
कोरोना रुग्णसंख्या : ३२
त्यामधील बाहेरगावी : १०
मृत्यू : १
उपचारार्थ : १
लसीकरण शिबिर : सहा
तपासणी शिबिर : २
प्रतिक्रिया :
कोरोनाविरुद्ध लढाईत ग्रामप्रशासनाला काही कटू निर्णय घ्यावे लागले. दरम्यान ग्रामस्थ, सामाजिक संस्थांचे तसेच आरोग्य विभागाचे सहकार्य मिळाले. त्यामुळे विविध उपाययोजना राबविता आल्या. याची गावातील रुग्णसंख्या रोखण्यासाठी मोठी मदत झाली. यापुढेही कोरोनाविरुद्ध लढाईसाठी प्रयत्नशील राहून गाव कोरोनामुक्त करूयात.
- हणमंत कणसे
उपसरपंच, अंगापूर वंदन