रुग्णवाहिकेचा व्यवसाय व्हेंटिलेटरवर, दरपत्रक निश्चित करण्याची मागणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 7, 2019 02:23 PM2019-12-07T14:23:23+5:302019-12-07T14:33:19+5:30

अ‍ॅब्युलन्स व्यवसायामध्ये प्रशासनाने लक्ष घालण्याची गरज निर्माण झाली आहे. रुग्णवाहिकेला व्यवसाय देण्यासाठी कमिशन मागणारेच आता या व्यावसायिकांची बदनामी करत आहेत. रुग्णसेवेत २४ तास गुंतलेला हा व्यवसाय सध्या व्हेंटिलेटरवर सुरू असल्याचे चित्र आहे. प्रशासनाने या व्यावसायिकांचे दरपत्रक निश्चित करून कमिशन खाणाऱ्यांना चाप बसविण्याची मागणी होताना दिसते.

Ambulance business on ventilator, demand to fix tariff | रुग्णवाहिकेचा व्यवसाय व्हेंटिलेटरवर, दरपत्रक निश्चित करण्याची मागणी

रुग्णवाहिकेचा व्यवसाय व्हेंटिलेटरवर, दरपत्रक निश्चित करण्याची मागणी

Next
ठळक मुद्देरुग्णवाहिकेचा व्यवसाय व्हेंटिलेटरवर, दरपत्रक निश्चित करण्याची मागणीकमिशन खाणाऱ्यांना चाप बसविण्यासाठी हवा पुढाकार

सातारा : अ‍ॅब्युलन्स व्यवसायामध्ये प्रशासनाने लक्ष घालण्याची गरज निर्माण झाली आहे. रुग्णवाहिकेला व्यवसाय देण्यासाठी कमिशन मागणारेच आता या व्यावसायिकांची बदनामी करत आहेत. रुग्णसेवेत २४ तास गुंतलेला हा व्यवसाय सध्या व्हेंटिलेटरवर सुरू असल्याचे चित्र आहे. प्रशासनाने या व्यावसायिकांचे दरपत्रक निश्चित करून कमिशन खाणाऱ्यांना चाप बसविण्याची मागणी होताना दिसते.

तातडीने उपचाराची गरज असणाऱ्या रुग्णाला रुग्णवाहिकेशिवाय पर्याय नसतो. कार्डियाक अ‍ॅम्ब्युलन्स, आॅक्सिजनसहित, आईस पेटीसहित तसेच विविध अत्याधुनिक साधने असलेल्या अ‍ॅम्ब्युलन्समधून रुग्णालयात नेईपर्यंत रुग्णाला सुरक्षितपणे नेता येते. सध्या मात्र या व्यवसायात कमिशनराज बोकाळल्याने परिस्थिती गंभीर बनत आहे. अत्यावस्थेतील रुग्णावर वेळेत उपचार होणे जितके जरुरीचे तितकेच त्या रुग्णाच्या नातेवाइकांची लूट होऊ नये, याची खबरदारी घेणेही आवश्यक बाब असते.

संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी जिल्हाधिकाऱ्यांपुढे आपली व्यथा मांडली. एखाद्या व्यक्तीची पाण्यात पडून सडलेला देहही रुग्णवाहिकेचे चालक उचलतात. त्यातून होणाऱ्या दुर्गंधीमुळे संसर्गजन्य आजाराला सामोरे जावे लागते. याचा विचार न करता रुग्णवाहिकाधारक रात्रंदिवस सेवा देत असतात. मात्र, या चालक, मालकांनाच बदनाम केले जात आहे.

दरम्यान, या व्यवसायात कमिशनराज बोकाळल्याने सातारा शहरातील अ‍ॅम्ब्युलन्स व्यावसायिकांनी एकत्रित येऊन संघटना स्थापन केली आहे. राजधानी अ‍ॅम्ब्युलन्स चालक-मालक सेवा संस्था या संस्थेचे धर्मादाय आयुक्तांकडे रजिस्ट्रेशनही करण्यात आले. या संस्थेच्या माध्यमातून व्यवसायातील वाद मिटविण्यात आले.

शहरात कुठूनही कॉल आला तर नंबरप्रमाणे अ‍ॅम्ब्युलन्स पाठविण्यात येऊ लागले आहेत. आता काही विघ्नसंतोषी लोक कमिशन मिळत नसल्याने अ‍ॅम्ब्युलन्स चालकांना बदनाम करत असल्याचा आरोप अ‍ॅम्ब्युलन्स चालक करत आहेत. तरी दरपत्रक निश्चित केल्यास ही बदनामीही थांबेल, असं संघटनेचं म्हणणं आहे. याबाबत संघटनेतर्फे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन सादर करण्यात आले आहे.

संघटनेचे अध्यक्ष आनंद जाधव, उपाध्यक्ष राहुल भंडारे, सचिव अर्जुन चव्हाण, खजिनदार शत्रुघ्न शेडगे, कार्यकारिणी संचालक हेमंत माने, राजू नायडू, सागर फाळके, कमलेश मंडल, अमोल काळे, अरुणा वाळवेकर, मीना पवार यांनी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिले.

रुग्णांना सुरक्षित पोहोचवताना चालकाचा जातोय जीव

अत्यवस्थ रुग्ण रुग्णवाहिकेत घेऊन त्याला हॉस्पिटलपर्यंत पोहोचविताना अ‍ॅम्ब्युलन्स चालकावर मोठी जबाबदारी असते. साताऱ्यातील अ‍ॅम्ब्युलन्सचालक शंकर पवार हे काही दिवसांपूर्वी रुग्ण घेऊन पुण्याला गेले होते, तेव्हा त्यांच्या छातीत दुखत होते. स्वत:च्या प्रकृतीकडे दुर्लक्ष करून ते पुण्याला गेले. मात्र, साताऱ्यात आल्यानंतर त्यांच्या छातीत जास्त दुखायला लागले. यातच त्यांचा मृत्यू झाला.

दरासंदर्भात सोमवारी बैठक

अ‍ॅम्ब्युलन्स चालकांचे रितसर दरपत्रक ठरविण्याच्या संदर्भाने सोमवारी उपप्रादेशिक परिवहन अधिकारी संजय राऊत यांच्यासोबत बैठक घेण्यात येणार आहे.

रुग्णांना कमी खर्चात सेवा देण्याचे काम आम्ही करत आहोत. स्वत:चा जीव धोक्यात घालून ही सेवा देण्यात आम्ही गुंतलो असताना नाहक बदनामीलाही सामोरे जावे लागते. यासाठी प्रशासनानेच पुढाकार घेणे आवश्यक आहे. महामार्गावर अपघातांचे प्रमाण वाढत असल्याने आनेवाडी टोलनाका ते काशीळपर्यंत मोफत सेवा देण्याचे संघटनेने ठरविले आहे.
- आनंद जाधव,
अध्यक्ष राजधानी अ‍ॅम्ब्युलन्स संघटना


रुग्णवाहिकांसाठी २0१३ साली दरपत्रक तयार करण्यात आले होते. जिल्ह्यातील रुग्णवाहिका चालकांना सोमवारी बैठकीसाठी बोलावले आहे. सर्वांशी चर्चा करुन सुवर्णमध्य काढला जाईल.
- संजय राऊत,
उपप्रादेशिक परिवहन अधिकारी, सातारा

 

 

 

 

Web Title: Ambulance business on ventilator, demand to fix tariff

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.