साताऱ्यातील कास पठारावर यंदा फुलांबरोबरच पर्यटकांचाही बहर!, दीड कोटींचा महसूल जमा
By दीपक शिंदे | Updated: October 30, 2023 14:22 IST2023-10-30T14:21:44+5:302023-10-30T14:22:11+5:30
ऑनलाईन व ऑफलाईन पद्धतीने पर्यटकांना प्रवेश देण्यात आला

साताऱ्यातील कास पठारावर यंदा फुलांबरोबरच पर्यटकांचाही बहर!, दीड कोटींचा महसूल जमा
पेट्री : जागतिक वारसास्थळ कास पठारावर यंदा निसर्गकृपा चांगली झाल्याने गतवर्षीपेक्षा जास्त फुले उमलली. यामुळे पर्यटकांची संख्याही दुप्पट झाली. यामुळे कासवर यंदा फुलांबरोबरच पर्यटकांचाही चांगला बहर आल्याचे पाहावयास मिळाले. पर्यटकांकडून दीड कोटी रुपयांचा महसूल जमा झाला आहे.
यावर्षी तीन सप्टेंबरला अधिकृत हंगाम सुरू झाला. ऑनलाईन व ऑफलाईन पद्धतीने पर्यटकांना प्रवेश देण्यात आला. यावर्षी सप्टेंबरनंतरच फुले चांगली बहरल्याने ऑनलाईनची तीन हजार तिकीट विकेंडला क्षणात संपत होती. तिकीट न मिळाल्याने अनेकजण थेट येत असल्याने शनिवार, रविवारी प्रचंड गर्दी होऊन वाहतूक कोंडीही झाली होती. यावर्षी पठारावरील कुंपण हटवल्याने पठारावर वेगवेगळ्या प्रजाती चांगल्या प्रकारे बहरल्याचे दिसून आले.
यामध्ये मोठ्या प्रमाणात येणारी गेंद, तेरडा, सीतेची आसवे, सोनकी, मिकीमाऊस, चवर यांचे गालिचे पाहावयास मिळाले. टोपली कारवीही यावर्षी बहरल्याचे पाहावयास मिळाले. अनेक दुर्मीळ प्रदेशनिष्ठ फुले कासवर येतात. यावर्षी यातील किटकभक्षी, ड्राॅसेरा इंडिका, बर्मानी, कंदीलपुष्प, आभाळी, नभाळी, आमरी, सातारेन्सीस, टूथब्रश अशी फुलेही चांगली होती. गतवर्षी पन्नास हजारांच्या आसपास पर्यटकांनी कासला भेट दिली होती. यातून सुमारे ७५ लाखांचा महसूल जमा झाला होता. पण, यावर्षी पर्यटकांची संख्या दुप्पट होण्याबरोबरच महसूलही दीड कोटींच्या पुढे गेला.
केवळ सव्वा महिने हंगाम
हंगाम तीन सप्टेंबर ते दहा ऑक्टोबर या कालावधीत फक्त सव्वा महिनेच चालला. यामध्ये शनिवार, रविवारी प्रचंड गर्दी होऊन अनेकांची गैरसोय झाली. ऑक्टोबरमध्ये पावसाने ओढ दिल्याने फुलांनी लवकर निरोप घेतला. दोन महिने चालणारा हंगाम सव्वा महिनेच चालल्याने शेवटच्या टप्प्यात येणाऱ्यांची निराशा तर अनेकांना हंगाम संपल्याने येता आले नाही. स्थानिक व्यावसायिकांना हंगाम कालावधी कमी झाल्याने नुकसान सहन करावे लागले.
कासचा हंगाम चांगला गेला असून स्थानिक लोकांना रोजगार उपलब्ध झाला आहे. वनविभागाशी चर्चा करून कासचे पर्यटन बारमाही होण्यासाठी परिसरातील नैसर्गिक स्थळांची पाहणी करून नवीन पाॅइंट विकसित करण्यासाठी प्रयत्नशील राहू. - सोमनाथ जाधव, माजी अध्यक्ष, कास समिती