लोकसभेसाठी जागा वाटपात प्रत्येकाचा सन्मान राखण्याचा प्रयत्न होईल - अजित पवार  

By प्रमोद सुकरे | Published: March 12, 2024 01:34 PM2024-03-12T13:34:31+5:302024-03-12T13:34:48+5:30

जेथे ज्या पक्षाचा विद्यमान खासदार तेथे त्याच पक्षाला जागा सोडावी अशी प्राथमिक चर्चा

Allotment of seats for Lok Sabha will try to maintain the dignity of everyone says Ajit Pawar | लोकसभेसाठी जागा वाटपात प्रत्येकाचा सन्मान राखण्याचा प्रयत्न होईल - अजित पवार  

लोकसभेसाठी जागा वाटपात प्रत्येकाचा सन्मान राखण्याचा प्रयत्न होईल - अजित पवार  

कराड : जेथे ज्या पक्षाचा विद्यमान खासदार आहे तेथे त्याच पक्षाला जागा सोडावी अशी महायुतीत आमची प्राथमिक चर्चा झाली आहे. येत्या दोन दिवसात त्याबाबतचा अंतिम निर्णय होईल, प्रत्येकाचा सन्मान राखला जाईल असाच निर्णय होईल असे मत राज्याचे उपमुख्यमंत्री व राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनी माध्यमांशी बोलताना व्यक्त केला.

कराड येथे दिवंगत यशवंतराव चव्हाण यांच्या १११ व्या जयंतीनिमित्त त्यांच्या स्मृतिस्थळाला अभिवादन करण्यासाठी उपमुख्यमंत्री अजित पवार आले होते. त्यावेळी माध्यमांनी विचारलेल्या प्रश्नांना उत्तर देताना ते बोलत होते. यावेळी सुनील तटकरे यांच्यासह मान्यवर उपस्थित होते.

सातारा लोकसभा मतदारसंघात राष्ट्रवादीचा खासदार आहे. त्यामुळे यावेळी ही जागा कोणत्या पक्षाला जाणार? याबाबत माध्यमांनी छेडले असता अजित पवार यांनी जेथे ज्या पक्षाचा विद्यमान खासदार आहे ती जागा त्याच पक्षाला द्यावी अशीच प्राथमिक चर्चा झाल्याचे मत व्यक्त केले.

वाचाळवीरांची संख्या वाढली

आज वाचाळवीरांची संख्या वाढली आहे. ती थांबली पाहिजे. दिवंगत यशवंतराव चव्हाण यांनी राजकारणातला सुसंस्कृतपणा आम्हाला शिकवला आहे. तो आदर्श आम्ही समोर ठेवला पाहिजे. वातावरण गढूळ होऊ नये याचे भान प्रत्येकाने ठेवूनच मत व्यक्त केले पाहिजे असेही पवार एका प्रश्नाला उत्तर देताना म्हणाले.

महायुती मधील छोटे घटक पक्ष नाराज आहेत याकडे लक्ष वेधले असता वरिष्ठ नेते याबाबत योग्य निर्णय घेतील असे पवार यांनी सांगितले. तर विजय शिवतारे यांनी बारामतीतून आव्हान दिलय याबद्दल विचारताच त्याबद्दल मला काही बोलायचे नाही असे सांगत त्यांनी या प्रश्नाला बगल दिली.

आमच्यात वैचारिक मतभेद, वैयक्तिक वाद नाहीत

आज आम्ही दिवंगत यशवंतराव चव्हाण यांच्या स्मृतीस्थळाला अभिवादन करण्यासाठी आलो आहे. यावेळी येथे खासदार श्रीनिवास पाटील, आमदार बाळासाहेब पाटील  हेही या ठिकाणी उपस्थित होते. समोर दिसल्यावर आम्ही एकमेकांशी संवादही केला. आमच्यात वैचारिक मतभेद असले तरी आमचे वैयक्तिक वाद नाहीत असेही मत यावेळी अजित पवार यांनी व्यक्त केले.

Web Title: Allotment of seats for Lok Sabha will try to maintain the dignity of everyone says Ajit Pawar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.