अजित पवार आज कराडमध्ये, राजकीय घडामोडींकडे सगळ्यांचे लक्ष
By प्रमोद सुकरे | Updated: March 12, 2025 01:34 IST2025-03-12T01:34:09+5:302025-03-12T01:34:33+5:30
सातारा जिल्हा हा एकेकाळी राष्ट्रवादी काँग्रेसचा बालेकिल्ला होता. पण आता ती परिस्थिती राहिलेली नाही याची सल अजित पवारांच्या मनामध्ये निश्चितच आहे.

अजित पवार आज कराडमध्ये, राजकीय घडामोडींकडे सगळ्यांचे लक्ष
-प्रमोद सुकरे, कराड
राज्याचे उपमुख्यमंत्री व राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष अजित पवार बुधवारी (१२ मार्च) कराड दौऱ्यावर असणार आहेत. निमित्त जरी दिवंगत यशवंतराव चव्हाण जयंतीचे असले, काँग्रेसचे नेते अँड.उदयसिंह पाटील यांच्याशी मुंबईत पक्षप्रवेशाबाबत झालेल्या चर्चेनंतर पवार प्रथमच कराड दौऱ्यावर येत असल्याने या दौऱ्यात काय राजकीय घडामोडी होणार? याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे.
'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!
दिवंगत यशवंतराव चव्हाण यांची कर्मभूमी म्हणून कराडची ओळख आहे. आधुनिक महाराष्ट्राचे शिल्पकार असणारे यशवंतराव चव्हाण यांच्या कराडला राजकीय पंढरी म्हणूनही ओळखले जाते.
अजित पवार यशवंतराव चव्हाणांच्या स्मृतिस्थळी जाणार
प्रत्येक वर्षी पुण्यतिथीला त्यांच्या स्मृतिस्थळी नतमस्तक होण्यासाठी महाराष्ट्रातील राजकीय मंडळीचा मेळा जमतो. पण त्याचबरोबर १२ मार्च च्या जयंतीच्या निमित्ताने अपवाद वगळता प्रत्येक वर्षी नतमस्तक होणारे नेते म्हणजे अजित पवार होत. बुधवारी (१२ मार्च) त्यांचा शासकीय दौरा नुकताच आला असून, सकाळी ७:३० वाजता त्यांचे कराडात आगमन होणार आहे.
त्यानंतर ते परत मुंबईला जाणार असे नमूद असले तरी तास दोन तासाच्या वेळेत 'कराडच्या पीचवर' ते नेमकी कोणती खेळी करणार? हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.
सातारा जिल्हा हा एकेकाळी राष्ट्रवादी काँग्रेसचा बालेकिल्ला होता. पण आता ती परिस्थिती राहिलेली नाही याची सल अजित पवारांच्या मनामध्ये निश्चितच आहे. म्हणून तर जिल्ह्यात राष्ट्रवादी काँग्रेसची ताकद पुन्हा प्रस्थापित करण्यासाठी त्यांनी वाई- खंडाळ्याला खासदारकी बरोबरच राज्याचे मदत पुनर्वसन मंत्री पदही बहाल केले आहे. त्यामुळे मंत्री मकरंद पाटील व खासदार नितीन पाटील यांच्यावरती जिल्ह्यात पक्ष वाढीची जबाबदारी आहे.
पाटलांच्या भेटीनंतर पहिल्यांदा कराडला
त्याचाच भाग म्हणून काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस व दिवंगत विलासराव पाटील (उंडाळकर) यांचे वारसदार अँड. उदयसिंह पाटील (उंडाळकर) यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रवेशासाठी वाई- खंडाळकर सरसावले आहेत. उपमुख्यमंत्री अजित पवार व अँड.उदयसिंह पाटील यांची मुंबई सह्याद्री अतिथी ग्रहावर भेट घडवून आणल्यानंतर अजित पवार प्रथमच कराडला येत असल्याने या दौऱ्याकडे राजकीय जाणकारांचे लक्ष लागून राहिले आहे. आता उद्याच्या दौऱ्यात नेमकं काय घडतंय? हे पाहण्यासाठी थोडा धीर धरलेलाच बरा.
'सह्याद्री'ची निवडणूकही सुरू
कराड तालुक्यातील सह्याद्री सहकारी साखर कारखान्याची निवडणूक ५ एप्रिल रोजी होत आहे.सध्या हा कारखाना शरद पवार राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते बाळासाहेब पाटील यांच्या ताब्यात आहे. तर कराड उत्तर चे भाजपचे आमदार मनोज घोरपडे यांनी सर्वांना बरोबर त्या विरोधात दंड थोपटले आहेत. त्यामुळे कराड तालुक्यातील राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे.अशातच उपमुख्यमंत्री अजित पवार कराड दौर्यावर येत असल्याने अनेकांची उत्सुकता ताणली आहे.