इच्छुकांचा एकाचवेळी दोन्हीकडे निशाणा!

By Admin | Updated: August 18, 2016 23:34 IST2016-08-18T23:34:19+5:302016-08-18T23:34:20+5:30

स्वबळाची भाषा : लहान कार्यक्रमातही नेत्यांची हजेरी--वडूज नगरपंचायत , मोर्चेबांधणी

Aimed at both times! | इच्छुकांचा एकाचवेळी दोन्हीकडे निशाणा!

इच्छुकांचा एकाचवेळी दोन्हीकडे निशाणा!

शेखर जाधव -- वडूज  खटाव तालुक्याचे मुख्यालय असलेल्या वडूज शहरात नगरपंचायतीचे वारे जोमाने फिरू लागले आहे, तसतसे नेत्यांची विचारधारा निवडणूक स्वबळावर लढविण्याची होऊ लागली आहे. इच्छुक उमेदवारांची वाढती संख्या पाहता नेतेमंडळींची डोकेदुखीही वाढू लागली आहे. ‘तुम्ही इकडून उमेदवारी देत नाही, तर तिकडून आपल्या नावाची चर्चा आहे, ’ असा इशारा ही देण्यास हे इच्छुक उमेदवार मागे पुढे पाहत नसल्याचे चित्र आहे. त्यामुळे मेळावे घेऊन आपापल्या पक्षाची भूमिका स्पष्ट करून नेतेमंडळींनी इच्छुकांची फिरकी घेतली आहे. दरम्यान, नेतेमंडळी आता लहान कार्यक्रमातही हजेरी लावत असल्याचे दिसू लागले आहे.
जिल्ह्याचे लक्ष लागून राहिलेली वडूज नगरपंचायत निवडणूक अतिशय चुरशीची होणार हे सांगायला कोणा ज्योतिष्याची गरज नाही. कारण गत महिन्यापासून कोणताही कार्यक्रम असो स्थानिक नेत्यांसह तालुक्यातील इतर नेते एकही संधी न सोडता पक्षीय पातळीवर टीका करताना आढळत आहेत. आ. जयकुमार गोरे यांनी जिल्हा पातळीवरील बैठकीत सर्वच निवडणुका स्वबळावर लढण्याचे संकेत दिले आहेत. राष्ट्रवादी आणि भाजपा यांचे मेळावे एकाच दिवशी असल्याने तळ्यात-मळ्यात वावरणाऱ्या कार्यकर्त्यांची मोठी गोची झाली. भाजपाच्या मेळाव्याला प्रतिसाद होता तर राष्ट्रवादीच्या मेळाव्याला कमी प्रतिसाद जाणवला. मात्र, भाषणबाजीत दोन्ही पक्षांच्या नेत्यांनी स्वबळावरची भाषा जरी केली असली तरी या दोघांचा पक्षीय शत्रू मात्र काँग्रेसच आहे. अद्यापही शिवसेनेची भूमिका गुलदस्त्यातच राहिल्याने वडूज नगरपंचायतीला पाहिजे असा रंग भरला जात नाही. त्यात रासप पक्षाची पावले नेमकी कोणीकडे चालली आहेत हे स्पष्ट न झाल्याने महायुती की युती विना? हे अद्याप स्पष्ट नाही.
खटाव तालुक्याचे विधानसभा मतदार संघाचे त्रिभाजन झाले असले तरी जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुका या तालुकाधर्तीवरच होणार असल्याने पक्षीय पातळीवर वरिष्ठांकडून इतर निवडणुकांबाबत मौन धरले आहे. आजपर्यंत वडूज ग्रामपंचायत निवडणूक ही पक्षविरहीत होत होती. परंतु पहिल्यादांच होणाऱ्या नगरपंचायतीला सर्वच पक्षांनी मोट बांधली आहे. त्यामुळे ही निवडणूक पक्षीय होणार की पक्षविरहीत याकडे सर्वच राजकीय जाणकारांसह वडूजकरांचे लक्ष लागून राहिले
आहे.

स्थानिक डोईजड होऊ नये याचीही काळजी
तालुक्याबाहेरील नेत्यांना आपले राजकीय अस्तिव टिकविण्यासाठी स्थानिक नेत्यांना हाताशी धरूनच नगरपंचायतील व्यूह रचना आखणे क्रमप्राप्त असले तरी स्थानिक नेता डोईजड होऊ नये याची ही काळजी घेतली जात असल्याचे दिसून येत आहे. अद्याप वडूज नगरपंचायतीचा रणसंग्राम लांब असला तरी नगरपंचायत पहिल्यांदा आपल्या ताब्यात असावी या दृष्टिकोनातून सर्वतोपरी प्रयत्न सुरू आहेत.

Web Title: Aimed at both times!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.