पुस्तक, मधाच्या गावानंतर सातारा जिल्ह्यात उदयास येतय गुलाबाचे गाव
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 20, 2025 17:08 IST2025-02-20T17:07:17+5:302025-02-20T17:08:19+5:30
पाचगणी : ‘गुलाब’ हे प्रेमाचे प्रतीक असणारे फूल आहे. फुलांचा राजा अशी ओळख आहे. महाराष्ट्रात प्रथम सातारा जिल्ह्यांत महाबळेश्वर ...

पुस्तक, मधाच्या गावानंतर सातारा जिल्ह्यात उदयास येतय गुलाबाचे गाव
पाचगणी : ‘गुलाब’ हे प्रेमाचे प्रतीक असणारे फूल आहे. फुलांचा राजा अशी ओळख आहे. महाराष्ट्रात प्रथम सातारा जिल्ह्यांत महाबळेश्वर तालुक्याने देशाला पहिले पुस्तकांचे गाव भिलार, मधाचे गाव मांघर अशी दोन गावे दिली. आत्ता महाबळेश्वरमध्येच गुलाबांच्या फुलांचे गाव म्हणून पारपारची ओळख उदयास येत आहे. त्याची जय्यत तयारी सुरू आहे.
गुलाबी गाव ही संकल्पना सातारा जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी याशिनी नागराजन यांनी मांडली. ती तत्काळ ग्रामपंचायत पारपारने स्वीकारली. त्यास गट विकास अधिकारी यशवंत भांड, सहायक गटविकास अधिकारी कांबळे यांनी सतत मार्गदर्शन व मोलाची साथ दिली. पारपार ग्रामपंचायतीचे ग्रामविकास अधिकार (ग्रामसेवक) शंकर चिकटूळ, सरपंच मनिषा सकपाळ, ग्रामपंचायत सदस्य, ग्रामस्थ यांनी झोकून देऊन कामाला सुरुवात केली. अल्पवधीत म्हणजे अवघ्या आठ ते दहा दिवसांत गावात साफसफाई, खडे खोदणे, झाडांची उपलब्धता करणे, ती लावून घेणे. जवळपास सध्या दीड हजार रोपांची लागवड केली असून, त्यात सातत्य ठेवत अजून दीड हजार रोपे टप्या टप्प्याने लावण्यात येणार आहेत.
महाबळेश्वर तालुक्यातील पारपार हे शिवकालीन बाजारपेठ असून त्यास ऐतिहासिक महत्त्व आहे. जवळच शिवकालीन पुल, राजमार्ग, मेटपारमधून कोकण दर्शन असे मुळातच गावाचं वैशिष्टय आहे. गावात शिवकालीन श्रीरामवरदानीचे भव्य असे मंदिर आहे. याचे पारपार ग्रामपंचायतीने गुलाबांचे गाव होण्याचा मान मिळविण्याकरिता कंबर कसली आहे. त्या दृष्टीने जय्यत तयारी सुरू आहे. संपूर्ण गावात, गल्लीबोळात व सर्वांचे घरासमोर गुलाबांची झाडे लावून त्याचे महत्त्व, फायदे याबाबतीत देखील जनजागृती व पर्यटनवृद्धी, असे सर्व उद्देश डोळ्या समोर ठेवून पारपार ग्रामपंचायत त्या दिशेने वाटचाल करत आहे.
रोजगाराबरोबरच पर्यटन वाढीसाठी मदत होणार
गुलाबाचे महत्त्व लक्षात घेता गुलकंद, गुलाब अत्तर, गुलाब सिरप उत्पादक गावात निर्माण होऊ शकतात. त्याचबरोबर फुले विक्री आणि त्या जोडीनेच प्रक्रिया उद्योगासाठीही फुलांची विक्री सुरू झाल्यास त्यांची ही गुलाबशेती वर्षभरासाठी गुलाबी बनेल. त्यामुळेच निश्चितच गावामध्ये रोजगार निर्माण होण्याबरोबरच पर्यटन वाढीसाठी मदत होणार आहे.