गौणखनिज वाहतूक करणाऱ्या दोन वाहनांवर कारवाई
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 7, 2021 17:43 IST2021-01-07T17:39:49+5:302021-01-07T17:43:56+5:30
Mahabaleshwar Hill Station Sataranews- महाबळेश्वर तालुक्यातील महसूल विभागाने अवैध गौणखनिज वाहतूक करणाऱ्या ट्रक व डंपर अशा दोन वाहनांवर २ लाख ३२ हजारांचा दंड वसूल केला आहे, अशी माहिती तहसीलदार सुषमा पाटील चौधरी यांनी दिली.

गौणखनिज वाहतूक करणाऱ्या दोन वाहनांवर कारवाई
महाबळेश्वर : महाबळेश्वर तालुक्यातील महसूल विभागाने अवैध गौणखनिज वाहतूक करणाऱ्या ट्रक व डंपर अशा दोन वाहनांवर २ लाख ३२ हजारांचा दंड वसूल केला आहे, अशी माहिती तहसीलदार सुषमा पाटील चौधरी यांनी दिली.
महाबळेश्वरमधील खेड्यापाड्यातील निसर्गरम्य ठिकाणातील काही भागात मोठ्या प्रमाणात बांधकाम सुरू आहे. बांधकामास उठावदारपणा किंवा जुन्याकाळी बंगल्याचा रुबाब यावा, यासाठी रत्नागिरी जिल्ह्यातील लाल चिऱ्याच्या दगडामध्ये बांधकाम करण्याची फॅशन आली आहे.
या दगडाची महाबळेश्वर तालुक्यामध्ये मोठ्या प्रमाणात मागणी आहे. हे दगड पोलादपूर मार्गे आंबेनळी घाटामधून महाबळेश्वरमध्ये येतात. दगड आणण्यासाठी मोठ्या प्रमाणात ट्रक व डंपरची वाहतूक आंबेनळी घाटातून सतत होत असते. या पार्श्वभूमीवर महसूल विभागाने कारवाईचा बडगा उगारला आहे.
बुधवारी मध्यरात्री साडेबाराच्या सुमारास महाबळेश्वर येथील डंपर (एमएच ११ सीएच ६८६१) व ट्रक (एमएच ११ एएल ४८२५) या दोन वाहनांवर कारवाई करण्यात आली आहे. त्यांच्याकडून २ लाख ३२ हजार रुपयांचा दंड वसूल केला आहे. दोन्ही वाहनांमध्ये दगडी चिराच असल्याचे स्पष्ट झाले.
ही कारवाई महाबळेश्वरच्या तहसीलदार सुषमा चौधरी-पाटील यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आली. या कारवाईमुळे अवैध गौणखनिज वाहतूक करणाऱ्यांचे ढाबे दणाणले आहेत. यापुढेही अशीच कारवाई करण्यात येणार आहे, असा इशारा मंडलाधिकाऱ्यांनी दिला.