Satara: कॅफेत प्रेमीयुगूलांचे अश्लिल चाळे; कऱ्हाडसह मलकापुरात कारवाईचा दणका, अनेक जोडप्यांवर कारवाई
By संजय पाटील | Updated: December 27, 2024 17:20 IST2024-12-27T17:20:09+5:302024-12-27T17:20:57+5:30
पोलिसांच्या चार पथकांकडून चालक, मालकांवर गुन्हे

Satara: कॅफेत प्रेमीयुगूलांचे अश्लिल चाळे; कऱ्हाडसह मलकापुरात कारवाईचा दणका, अनेक जोडप्यांवर कारवाई
कऱ्हाड : येथील उपविभागीय पोलिस पथकाने शुक्रवारी कऱ्हाड, मलकापूर परिसरातील कॅफेंवर कारवाईचा धडाका लावला. उपअधिक्षक अमोल ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली चार स्वतंत्र पथके करुन त्यांच्यामार्फत कारवाई करण्यात आली.
यावेळी अनेक कॅफेंमध्ये नियमांचे उल्लंघन होत असल्याचे दिसून आल्याने पोलिसांनी कॅफे चालकांना ताब्यात घेतले. तसेच आक्षेपार्ह कृत्य करणारी अनेक जोडपीही पोलिसांच्या कारवाईत अडकली. त्यांच्यावर मुंबई पोलिस कायदा कलमान्वये कारवाई करण्यात आली.
दरम्यान, वारंवार सुचना देऊनही प्रेमीयुगुलांना कॅफेत आडोशाची जागा करून ठेवणाऱ्या कॅफे चालक व मालकांवर गुन्हे दाखल करण्याची कार्यवाही कऱ्हाड शहर पोलिसांनी वेगाने सुरू केली आहे. अवघ्या दोन तासांच्या कारवाईत दहा कॅफेंवर कारवाईचा बडगा उगारण्यात आला.
कऱ्हाड, मलकापूर परिसरात अनेक ठिकाणी आडोशाला तर सेवारस्त्यालगत कॅफेंची संख्या वाढली असून याठिकाणी प्रेमीयुगूले अश्लिल चाळे करत बसलेली असतात.
यासंदर्भात पोलीस उपअधिक्षक अमोल ठाकूर यांनी साध्या वेशातील पोलिसांमार्फत खात्री करून एकाचवेळी चार पथकांकडून कारवाई करण्याची व्युहरचना आखली. एकाचवेळी कारवाई झाल्याने कॅफेचालकांची चांगलीच पाचावर धारण बसली. यापुढेही गैरप्रकार चालणाऱ्या कॅफेंवर कारवाई सुरूच ठेवण्याची सुचना पोलिस अधीक्षक समीर शेख, अपर पोलिस अधीक्षक डॉ. वैशाली कडुकर यांनी दिल्या आहेत.