अपघात कमी होईनात; अधिकारी, ठेकेदार फोन उचलेनात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 22, 2021 04:25 IST2021-06-22T04:25:52+5:302021-06-22T04:25:52+5:30
मायणी : मल्हारपेठ-पंढरपूर राज्यमार्गावरील पवारमळा ते गुंडेवाडी (मराठानगर) दरम्यानचे काम निकृष्ट झाले आहे. साईडपट्ट्यांवरही काळी माती भरल्यामुळे सतत अपघात ...

अपघात कमी होईनात; अधिकारी, ठेकेदार फोन उचलेनात
मायणी : मल्हारपेठ-पंढरपूर राज्यमार्गावरील पवारमळा ते गुंडेवाडी (मराठानगर) दरम्यानचे काम निकृष्ट झाले आहे. साईडपट्ट्यांवरही काळी माती भरल्यामुळे सतत अपघात होत आहेत. यासंदर्भात अधिकारी, कर्मचाऱ्यांना दूरध्वनी केला तर ते उचलत नाहीत. या कामाची चौकशी करून या मार्गाचे रुंदीकरण करावे, अशी मागणी गुंडेवाडी (मराठानगर) ग्रामस्थांनी पालकमंत्री बाळासाहेब पाटील यांच्याकडे केली आहे.
निवेदनात म्हटले आहे की, मल्हारपेठ-पंढरपूर राज्यमार्गावरील पवारमळा गुंडेवाडी (मराठानगर) येथील काम नोव्हेंबर महिन्यात पूर्ण झाले होते. त्यावेळी संबंधित ठेकेदाराने साईडपट्टीवर परिसरातीलच काळी माती भरून काम उरकले होते. त्यावेळी हे काम निकृष्ट असल्याबाबत ग्रामस्थांनी संबंधित ठेकेदार व अधिकाऱ्यांच्या निदर्शनास आणून दिले होते. मात्र ‘काम नव्याने व योग्य पद्धतीने करून देतो, ठेकेदाराला चांगले काम करण्याबाबत सूचना दिल्या आहेत,’ असे सांगून चालढकल करत होते. काम पूर्ण केले. मात्र पावसाळा सुरू होताच या काळ या मातीने भरलेल्या साईड पट्टीवर चिखलाचे साम्राज्य निर्माण झाले आहे अनेक लहान-मोठे अपघात घडत आहे.
याबाबत अधिकाऱ्यांशी चौकशी करण्यासाठी ग्रामस्थ फोनवर संबंधित अधिकाऱ्यांना विचारपूस करीत होते. मात्र संबंधित अधिकाऱ्यांनी त्यांचे फोन उचलायचे बंद केले. त्यामुळे आक्रमक झालेल्या गुंडेवाडी (मराठानगर) येथील ग्रामस्थांनी पालकमंत्री बाळासाहेब पाटील यांना निवेदन देऊन या मार्गाचे काम व्यवस्थित व रुंदीकारणाने पूर्ण करून सदर अधिकाऱ्यांची चौकशी करावी अशीही मागणी केली आहे. यावेळी सरपंच प्रतिनिधी शरद निकम, उपसरपंच किसन निकम, माजी सरपंच दादासाहेब निकम, रणजित निकम, शिवाजी निकम उपस्थित होते.
चौकट
दोन तासांत काम सुरू
पालकमंत्री बाळासाहेब पाटील यांची भेट घेऊन सदर कामाच्या वस्तुस्थिती सांगितली. पाटील यांनी काम तातडीने सुरू करण्याचे आदेश दिले. दोनच तासांत या मार्गाचे दुरुस्तीचे काम हाती घेण्यात आले.