राज्यातील रस्त्यांची अपूर्ण कामे पूर्ण करत सातारा जिल्ह्याच्या औद्योगिक विकासाला गती - मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 24, 2024 14:04 IST2024-12-24T14:04:06+5:302024-12-24T14:04:54+5:30
कितीही जबाबदाऱ्या वाढल्या तरी सातारकरांसाठी कायम तत्पर

राज्यातील रस्त्यांची अपूर्ण कामे पूर्ण करत सातारा जिल्ह्याच्या औद्योगिक विकासाला गती - मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले
सातारा : राज्यातील बांधकाम विभागाच्या विकासाची जबाबदारी पक्ष नेतृत्वाने दिली आहे. ती अत्यंत चांगल्या पद्धतीने पार पाडणार असून राज्यातील अपूर्ण रस्त्यांची कामे तातडीने पूर्ण करण्यावर भर दिला जाईल. त्याबरोबरच जिल्ह्यातील एमआयडीसी पुन्हा चांगल्या पद्धतीने सुरु करण्यासाठी प्रयत्न केले जातील असे मत सार्वजनिक बांधकाममंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी व्यक्त केले.
मंत्रिपदी निवड झाल्यानंतर नागपूर अधिवेशनाचे कामकाज संपवून शिवेंद्रराजे भोसले रविवारी रात्री उशिरा जिल्ह्यात दाखल झाले. यानंतर सोमवारी त्यांनी ‘लोकमत’ सातारा कार्यालयास सदिच्छा भेट दिली. यावेळी ते बोलत हाेते.
शिवेंद्रसिंहराजे भोसले म्हणाले, जबाबदारी वाढली, तरी मी कालही सातारकरांसाठी कायम उपलब्ध होतो आणि यापुढेही त्यांच्यासाठी हजर असेन. त्यासाठीचे वेळेचे योग्यरीतीने नियोजन करणार असल्याचेही त्यांनी सांगितले.
शक्तिपीठ महामार्गाबाबतची सर्व माहिती मागवून घेणार आहे. यानंतर योग्य तो निर्णय घेण्यात येईल. सातारा-पुणे महामार्गाच्या कामाबद्दल तक्रारी आहेत. सातारा-पंढरपूरचा रस्ता झाला असला, तरी त्या कामाबाबतही अनेक तक्रारी आहेत. यातील जे काम रिलायन्सकडे आहे, त्यांनी योग्य दर्जा राखलेला दिसत नाही. त्यामुळे त्यांचे काम काढून घेण्याबाबत केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांच्याशी चर्चा झाल्याचेही त्यांनी सांगितले. बांधकाम अधिकाऱ्यांनी ठेकेदारांबाबत सक्त धोरण ठेवले पाहिजे. काम निकृष्ट असेल तर बिले काढता कामे नये, तसेच रस्त्यांच्या कामाचे क्वालिटी कंट्रोल योग्यरीतीने होण्याची गरज असल्याचे त्यांनी सांगितले.
माझ्या मतदारसंघासह सातारा जिल्ह्यासाठी मोठा निधी आणला जाईल. विधानसभेवर जिल्ह्यातील तीन नवीन आमदार निवडून गेले आहेत. कऱ्हाड दक्षिणमध्ये मनोज घोरपडे आणि उत्तरमध्ये अतुल भोसले यांच्याही मतदारसंघातील विकासकामांसाठी योग्य ते सहकार्य करण्याची माझी भूमिका राहणार असल्याचे शिवेंद्रराजे भोसले यांनी सांगितले.
जिल्ह्यात औद्योगिक विकासासाठी सर्वंकष प्रयत्न
सातारा जिल्ह्यात औद्योगिक विकास रखडला आहे. सातारा एमआयडीसीचा विस्तार करण्याची गरज आहे. त्यासाठी ग्रामस्थांचा विरोध आहे. तथापि, यासाठी सर्वांशी सुसंवाद साधून योग्य तो निर्णय घेतला जाईल. यासाठी आमदार महेश शिंदे यांच्यासमवेत बैठक घेणार आहे. ज्या ठिकाणी शेती होत नाही, अशा नापिक जमिनी उपलब्ध झाल्या, तर हा प्रश्न सुटणार आहे. साताऱ्यात कोणताही मोठा प्रकल्प नाही. त्यामुळे एखादा मोठा प्रकल्प होऊन हजारो युवकांना नोकऱ्या लागल्या, तर त्यांना बाहेरील शहरांत जाण्याची गरज भासणार नाही. त्यामुळे यासाठी मुख्यमंत्री यांच्याकडे पाठपुरावा करणार असल्याचे मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी सांगितले.