आजरा सार्वजनिक बांधकामची खरडपट्टी
By Admin | Updated: January 8, 2015 00:01 IST2015-01-07T21:55:31+5:302015-01-08T00:01:50+5:30
बेलेवाडी घाटकाम निकृष्ट : रस्त्यांची दुर्दशा झाल्याने सदस्य आक्रमक

आजरा सार्वजनिक बांधकामची खरडपट्टी
आजरा : बेलेवाडी नदीघाटाचे झालेले निकृष्ट काम, रस्ता दुरूस्तीसाठी केलेला १७ लाखांचा खर्च व अधिकाऱ्यांकडून पंचायत समिती मिटींगला वारंवार मारली जाणारी दांडी या पार्श्वभूूमीवर सभापती विष्णुपंत केसरकर, सदस्या निर्मला व्हनबट्टे यांच्यासह सर्वच सदस्यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाची चांगलीच खरडपट्टी काढली. रस्ते डांबरीकरणाचे, खड्डे मुजविण्याचे काम निकृष्ट दर्जाचे असून कामाची पाहणी न करता बिले अदा केल्याप्रकरणी चौकशीचा ठराव सभेत करण्यात आला. आजरा पंचायत समितीची मासिक सभा सभापती विष्णुपंत केसरकर यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. गटविकास अधिकारी ए. डी. कांबळे यांनी उपस्थितांचे स्वागत केले. सार्वजनिक बांधकाम खात्याच्या कारभाराबाबत सभेत वादळी चर्चा झाली. बेलेवाडी नदीघाटाच्या बांधकामाचा प्रश्न सदस्या निर्मला व्हनबट्टे यांनी उपस्थित केला. झालेले काम अत्यंत निकृष्ठ दर्जाचे असून नेतेमंडळींच्या हातापाया पडून कामे मंजूर करून आणायची आणि अधिकाऱ्यांनी कामे न पाहताच टक्केवारीशी मतलब ठेवत बिले अदा करायची, असा प्रकार घडत असल्याचे सदस्या कामिनी पाटील व सभापती विष्णुपंत केसरकर यांनी स्पष्ट केले. सार्वजनिक बांधकाम खात्याने खड्डे मुजविण्याच्या नावाखाली तब्बल साडेसतरा लाख रूपये खर्च केले. परिस्थिती पाहिल्यास हे साडेसतरा लाख रूपये खड्ड्यात गेल्याचे दिसते. चुकीच्या पद्धतीने हा विभाग बिले अदा करीत असल्याचा आरोपही सदस्यांनी करत चौकशीचा ठराव मांडला. ‘एक घरी, एक नोकरी’, हा प्रकार फसवा ठरत असून सुशिक्षित बेरोजगारांना नोकरीचे गाजर दाखवून प्रशिक्षण दिले जाते. एखाद्या खासगी कंपनीत दोन-तीन महिन्यांकरिता नोकरी लावली जाते आणि कंपनी बंद झाल्याने अशा तरूणांच्या पदरी निराशाच येत असल्याने हा प्रकार बंद करावा, अशी मागणी सदस्या कामिना पाटील यांनी केले. दहा विंधनविहिरींना पाणी टंचाई आराखड्यांतर्गत मंजुरी मिळाली. प्रत्यक्षात जुलै महिन्यात चार विंधन विहिरी खोदल्या गेल्या. उर्वरित सहा विंधन विहिरींचा पत्ताच नाही? हा काय प्रकार आहे? असा सवाल सदस्या अनिता नाईक यांनी केला. कृषिसंजीवनी योजनेला ३१ मार्चपर्यंत मुदतवाढ देण्यात आल्याचे वीज वितरण कंपनीचे अधिकारी सिकनीस यांनी स्पष्ट केले. जलयुक्त शिवार अभियानांतर्गत ९८ गावांचे आराखडे तयार करण्यात आल्याचे तालुका कृषी अधिकारी श्रीकांत निकम यांनी स्पष्ट केले. यावेळी विविध खात्यांच्या कामकाजाचा आढावा घेण्यात आला. उपसभापती दीपक देसाई यांनी आभार मानले. (प्रतिनिधी) तीन महिने एकच उत्तर रस्त्याशेजारील वाढलेली झाडे काढा असे गेले तीन मिटींगला सांगितले जाते. पण, प्रत्येक मिटींगला अधिकारी दोनच दिवसांची मुदत मागतात, हा काय प्रकार आहे, असा सवाल कामिना पाटील यांनी केला. नगाला नग नको केवळ उपस्थिती दर्शविण्यासाठी सभेला येणाऱ्यांनी येथून पुढे हजर राहू नये. पूर्ण माहिती नसेल, तर सभेला केवळ नगाला नग म्हणून हजर राहता का? असा संतप्त सवाल केसरकर यांनी बांधकाम विभागाला केला.