सातारा : अल्पवयीन मुलीची घरीच प्रसूती करून अर्भकाचे शिर धडावेगळे केले

By संजय पाटील | Updated: March 8, 2023 07:56 IST2023-03-08T07:54:36+5:302023-03-08T07:56:16+5:30

ढेबेवाडी विभागातील प्रकार : पीडित मुलीच्या बापाला अटक; अत्याचार करणाराही गजाआड

A minor girl was delivered at home and the infant s head was severed killed by her father | सातारा : अल्पवयीन मुलीची घरीच प्रसूती करून अर्भकाचे शिर धडावेगळे केले

सातारा : अल्पवयीन मुलीची घरीच प्रसूती करून अर्भकाचे शिर धडावेगळे केले

कराड : अत्याचारानंतर साडेआठ महिन्यांची गर्भवती असलेल्या अल्पवयीन मुलीची घरीच प्रसूती करून जन्मलेल्या बाळाचे शिर धडावेगळे करीत ते नाल्यामध्ये टाकून दिल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी ढेबेवाडी पोलिसांनी पीडित मुलीच्या बापाला ताब्यात घेऊन अटक केली. तर मुलीवर अत्याचार करणाऱ्याच्याही मुसक्या आवळण्यात आल्या आहेत.

पोलीस अधीक्षक समीर शेख यांनी दिलेल्या माहितीनुसार, ढेबेवाडी भागातील एका गावातील अल्पवयीन मुलीवर अत्याचार झाला होता. त्यातून ती ८ महिने २१ दिवसांची गर्भवती राहिली होती. याप्रकरणी आरोपीवर बाललैंगिक अत्याचार कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता. गुन्ह्यात आरोपीला अटक करून पीडित अल्पवयीन मुलीच्या वैद्यकीय तपासणीसाठी तिला रुग्णालयात नेण्यात आले होते. मात्र, मुलीच्या पोटात गर्भ नसल्याचे त्यावेळी वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या निदर्शनास आले.

पोलिसांनी त्याबाबत मुलीकडे विचारणा केली असता वडिलांनी घरीच प्रसूती केल्याचे मुलीने सांगितले. तसेच जन्मलेले बाळ रडत असल्यामुळे शेजाऱ्यांना समजायला नको म्हणून वडिलांनी बाळाचे तोंड दाबून घरातील पारळीने त्याचे शिर धडावेगळे केले. तसेच ते नाल्यामध्ये टाकून देऊन नष्ट करण्याचा प्रयत्न केल्याची माहिती मुलीने पोलिसांना दिली. हा प्रकार उघडकीस आल्यानंतर पोलिसांनी मुलीच्या बापावर गुन्हा दाखल करून त्याला अटक केली. पोलीस उपअधिक्षक विवेक लावंड, सहाय्यक पोलीस निरीक्षक अभिजीत चौधरी, उपनिरीक्षक दिपज्योती पाटील तपास करीत आहेत.

Web Title: A minor girl was delivered at home and the infant s head was severed killed by her father