वाईतील भाजी मंडईमधील सकुंडे वाड्याला भीषण आग, लाकडी इमारत असल्याने आग विझविण्यासाठी शर्तीचे प्रयत्न
By दीपक शिंदे | Updated: October 9, 2023 18:48 IST2023-10-09T18:47:41+5:302023-10-09T18:48:10+5:30
वाई : वाई शहरातील भाजी मंडईतील अतिशय जुन्या असलेल्या व संपूर्ण लाकडी बांधकाम असलेल्या सकुंडे यांच्या जुन्या वाड्याला सोमवारी ...

वाईतील भाजी मंडईमधील सकुंडे वाड्याला भीषण आग, लाकडी इमारत असल्याने आग विझविण्यासाठी शर्तीचे प्रयत्न
वाई : वाई शहरातील भाजी मंडईतील अतिशय जुन्या असलेल्या व संपूर्ण लाकडी बांधकाम असलेल्या सकुंडे यांच्या जुन्या वाड्याला सोमवारी दुपारी बाराच्य़ा सुमारास भीषण आग लागली. या परिसरात वाई नगरपालिकेची शाळा तसेच दुकाने असल्याने दुकानदारांचे फार मोठे नुकसान झाले. आगीत घरातील जीवनावश्यक वस्तू जाळून खाक झाल्या.
दरम्यान, सोमवार मंडईचा दिवस असल्याने आग विझविताना अग्निशमन बंबाला शर्तीचे प्रयत्न करावे लागले. तर व्यापाऱ्यांसह नागरिकांची मोठी धावपळ उडाली. शेजारी शाळेतील मुलांचा भीतीने थरकाप उडाला, त्यांना पालिकेच्य़ा दुसऱ्या शाळेत हलविण्यात आले. श्रीसाई सप्लायर्स यांचे कर्मचारी, स्थानिक नागरिक, सर्व नगरसेवक, भाजी मंडईतील व्यापारी, मदत पथकाने पुढाकार घेतल्याने आगीवर नियंत्रण मिळविण्यात यश आले.
आग विझवण्यासाठी वाई नगरपालिकेचे दोन अग्निशमन बंब, किसन वीर सहकारी साखर कारखाना, पाचगणी नगरपालिकेचे अग्निशमन बंबांनी चार तास प्रयत्न केल्यानंतर आग आटोक्यात आली. बघ्यांची गर्दी झाल्याने पोलिसांना त्यांना हटविताना कसरत करावी लागली.
वाई शहरातील जुन्या इमारतींना आग लागण्याचे प्रमाण वाढल्याने या घटनेकडे लोक संशयाने पाहायला लागले आहेत. घटनेची नोंद करण्याचे काम उशिरापर्यंत सुरू होते.