कऱ्हाड तालुक्यातील तांबव्याच्या शिवारात रानगव्यांचा कळप, शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 2, 2022 14:07 IST2022-05-02T14:07:07+5:302022-05-02T14:07:35+5:30
शेतामध्ये सुमारे दोन तास चार ते पाच रानगवे ठिय्या मारून होते.

कऱ्हाड तालुक्यातील तांबव्याच्या शिवारात रानगव्यांचा कळप, शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण
तांबवे : कऱ्हाड तालुक्यातील तांबवे गावात काल, रविवारी रानगव्यांचा कळप घुसला. सकाळी गावच्या कमानीजवळ चार ते पाच रानगवे आल्याने गावकऱ्यांची चांगलीच धावपळ उडाली. तांबवे परिसरात बिबट्याचा मुक्काम असतानाच आता रानगवे गावात आल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. वनविभागाने या रानगव्यांचा बंदोबस्त करावा, अशी मागणी नागरिकांनी केली आहे.
तांबवे गावात कमानीजवळ जिल्हा परिषद सदस्य प्रदीप पाटील यांच्या घराजवळ असलेल्या आनंदा विठ्ठल पवार यांच्या शेतामध्ये सुमारे दोन तास चार ते पाच रानगवे ठिय्या मारून होते. दोन तासांनी डाग रानाकडे ते गेले. रानगव्यांची माहिती मिळताच गावातील लोकांनी शेताकडे धाव घेतली. एकाच वेळी चार ते पाच रानगवे उसाच्या शेतात घुसल्याने मोठ्या प्रमाणावर उसाचे नुकसान झाले आहे. रानगव्यांचा कळप गावच्या तोंडावर असलेल्या शेतात घुसल्याने शेतकरी वर्गात भीतीचे वातावरण आहे. या परिसरात असलेल्या शेतकरी तसेच रहिवासी लोकांनी या रानगव्यांचा बंदोबस्त करण्याची मागणी केली.