सातारा : सातारा नगरपालिकेच्या सोनगाव येथील कचरा डेपोने मंगळवारी आगीमुळे अक्षरश: रौद्र रूप धारण केले. सोमवारी लागलेली आग दुसऱ्या दिवशीही अधिकच भडकत गेल्याने संपूर्ण जकातवाडी, सोनगाव आणि शेंद्रे परिसराचा श्वास कोंडला. कचरा डेपोतून निघणाऱ्या काळ्याकुट्ट धुराचे लोट वाऱ्याच्या वेगाने सर्वदूर पसरल्याने परिसरातील नागरिकांची अक्षरश: घुसमट झाली.सातारा पालिकेच्या अग्निशमन दलाने सोमवारी दिवसभरात आगीवर नियंत्रण मिळविण्याचे अटोक्यात प्रयत्न केले. मात्र, परिस्थिती हाताबाहेर जात असल्याचे पाहून अखेर प्रशासनने तातडीने मदतीसाठी महाबळेश्वर, रहिमतपूर व अन्य पालिकांच्या अग्निशमन दलाला पाचारण केले.आग विझवण्याचे हे प्रयत्न दिवसभर युद्धपातळीवर सुरू होते, मात्र आगीची तीव्रता एवढी होती की धुराचे लोट थांबण्याचे नाव घेत नव्हते. आणीबाणीच्या परिस्थितीत नगराध्यक्ष अमोल मोहिते व आरोग्य सभापती धनंजय जांभळे यांनी अधिकारी व कर्मचाऱ्यांसमवेत तातडीने घटनास्थळी धाव घेतली. तसेच कर्मचाऱ्यांना उपाययोजना सुचवल्या.
धुरात गावे झाली गायब...या भीषण धुरामुळे जकातवाडी परिसरावर दुपारच्या वेळीही भयाण काळोख पसरला होता. धुरामुळे दृश्यमानता इतकी कमी झाली होती की, परिसरातील गावे आणि वाड्या-वस्त्या जणू धुराच्या साम्राज्यात गडप झाल्याचा भास होत होता. या धुराने नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न गंभीर केला असून, श्वास घेताना होणारा त्रास आणि डोळ्यांची जळजळ यामुळे सर्वसामान्य जनता त्रस्त झाली.
वाहनधारकांना करावी लागली कसरत..धुरामुळे सातारा-शेंद्रे हा मुख्य वर्दळीचा रस्ताच धुराने गिळंकृत केला होता. या मार्गावरून जाणारे शाळकरी विद्यार्थी, शेतकरी आणि चाकरमान्यांसाठी प्रवास करताना कसरत करावी लागली. अपघाताची टांगती तलवार आणि श्वास कोंडणारी परिस्थिती लक्षात घेता, वाहतूक पोलिसांना रस्ताच वाहतुकीसाठी बंद करावा लागला. धूर निवळताच वाहने सोडली जात होती.
नगराध्यक्ष व मी स्वत: रात्री आठ वाजेपर्यंत कचरा डेपोत तळ ठोकून होतो. प्रशासनाकडून आग विझविण्याचे शर्थीचे प्रयत्न सुरू असून, यासाठी अन्य पालिकांची मदतही घेतली जात आहे. परिसरातील नागरिकांनी घाबरून न जाता पालिकेला सहकार्य करावे. एक-दोन दिवसांत आग पूर्ण आटोक्यात आणली जाईल. - धनंजय जांभळे, आरोग्य सभापती
या धुराचा व दुर्गंधीचा जकातवाडी, सोनगाव, साठेवाडी, डबेवाडी येथील ग्रामस्थांना प्रचंड त्रास सहन करावा लागत आहे. पालिका प्रशासनाने या गंभीर प्रश्नाबाबत योग्य ती कार्यवाही करावी अन्यथा ग्रामस्थांकडून तीव्र आंदोलन केले जाईल. - अश्विनी दळवी, सरपंच, जकातवाडी
Web Summary : A massive fire at Satara's Songaon garbage depot choked nearby areas with thick smoke. Firefighters struggled to control the blaze, prompting evacuations. Residents faced breathing difficulties and eye irritation, disrupting daily life and prompting road closures. Efforts to extinguish the fire continue.
Web Summary : सतारा के सोनगाँव कचरा डिपो में भीषण आग लगने से आसपास के इलाके धुएं से भर गए। दमकल कर्मी आग पर काबू पाने के लिए संघर्ष कर रहे हैं, जिसके कारण लोगों को सांस लेने में तकलीफ और आंखों में जलन हो रही है। दैनिक जीवन बाधित, सड़कें बंद। आग बुझाने के प्रयास जारी हैं।